गळफास लावून युवकाची आत्महत्या

0
114

अर्जुनी-मोरगाव : घरातील मयालीला दोर बांधून गळफास लावून एका 36 वर्षीय युवकाने आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार, 20 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास तालुक्यातील बोंडगावदेवी येथे घडली. मनोज कुंडलिक मानकर (वय 36) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. मात्र या प्रकारामुळे त्याचे कुटुंब उघड्यावर येण्याची पाळी उद्भवली आहे.

सविस्तर असे की, मनोज हा आई उर्मिला, पत्नी कविता, 13 वर्षाचा मुलगा हर्षल, 9 वर्षाचा मुलगा जयंत असे पाच जण एकत्र राहत होते. वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबाची जबाबदारी मनोजवर आली होती. मोलमजुरी व हाती आलेले काम करून तो आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत होता. घटनेच्या दिवशी तो कामावर गेला नाही. आई व पत्नी मजुरीच्या कामाला गेले होते. दोन्ही मुले शाळेत गेली होती. घटनेपूर्वी त्याने पत्नीसोबत बोलून घरी केव्हा येणार, अशी विचारणाही केली होती. घरात कोणीही नसल्याची संधी साधून त्याने घरातील धाब्याच्या मयालीला गळफास लावून आत्महत्या केली.

शाळेतून मुलगा घरी आल्यावर आतून कडी लावली असल्याचे लक्षात आले. त्याने आईला बोलावून आणले. पत्नी घरी येताच आतील कडी काढल्यानंतर मनोज गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आला. या घटनेची माहिती अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्याला देण्यात आली. त्यानंतर पोलीस निरीक्षक महादेव तोदले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम, बीट अंमलदार इस्कापे, कोरे, पुण्यप्रेसड्डीवार घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले.

कुटुंब उघड्यावर…
मनोजने आत्महत्या केल्याने त्याच्या कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. घरातील कर्ता पुरूष गेल्याने आता उदरनिर्वाह कसा चालणार, अशी चिंता त्याच्या कुटुंबियांना सतावत आहे. पोलीस तपासात मृत्यूपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी मिळाली. त्यात माझ्यावर गावातील काही लोकांचे पैसे आहेत, जवळ पैसे नाही. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे. असे मनोजने या चिठ्ठीमध्ये लिहून ठेवले, असे सांगितले जात आहे.