मृत्यू झालेल्या घरातच लाखोंच्या दागिन्यांवर हात साफ

0
48

तिरोडा : घरात तरुण व्यक्तीचा मृत्यू. सर्व कुटुंबिय व नातलग विलाप करतात. सर्वत्र दुःखद वातावरण. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी सर्व कुटुंबिय व नातलग प्रेताला स्मशानात नेतात. आणि इकडे कुणीही नसल्याच्या संधीचा लाभ घेण्यासाठी चोर घरात घुसतात आणि लाखो रुपये किंमतीच्या दागिन्यांवर हात साफ करतात. नेमकी अशीच चोरीची घटना तिरोडा शहरात 26 ऑगस्टच्या दुपारी 12.30 ते 27 ऑगस्टच्या सकाळी 10 वाजताच्या दरम्यान घडली.

फिर्यादी डॉ.आशीष रमेश बंसोड (वय 38)यांच्या भावाचे निधन झाले होते. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी सर्व नातलग घरी जमा झाले होते. फिर्यादीच्या पत्नीने आलमारी उघडताच त्यात ठेवलेले सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम गायब असल्याचे समजले.

घरात कुणीही नसल्याची संधी साधून चोरांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. आलमारीत ठेवलेले जवळपास 3 लाख 34 हजार 550 रुपये किंमतीचे सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम घेवून पसार झाले. आधीच घरात दुःखद वातावरण, त्यातच चोरीच्या या घटनेने दुःखात भर घातली. या प्रकरणात तिरोडा पोलिसांनी भादंविच्या कलम 380 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.