दोन आरोपींना अटक:पिस्तुलसह ११ जिवंत काडतूस जप्त

0
18

भंडारा-तीन युवकांमध्ये चर्चा सुरू असताना अचानक एकाकडे असलेल्या पिस्तुलातून गोळी सुटली. यात एक जखमी झाला. त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केल्यानंतर या घटनेचे बिंग फुटले. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून पिस्तुलसह दोन मॅगजीन व ११ जिवंत काडतुस जप्त केले आहे. ही घटना अड्याळ पोलिस ठाण्यांतर्गत बोरगाव येथे उघडकीस आली. दरम्यान या तरुणांकडे पिस्तुल आणि काडतूस आले कुठून? याचा तपास पोलिस करीत आहेत.
आशुतोष गेडाम (वय २५) रा. बेला, विपीन रामटेके (वय २५) रा. बोरगाव व मिथुन दहिकर (वय ३२) रा.बोरगाव अशी आरोपींची नावे आहेत.
३ जानेवारी रोजी पवनी मार्गावरील जंगलव्याप्त बोरगाव ते खापा येथील पुलावर सदर तीन आरोपी चर्चा करीत होते. त्यांच्याकडे पिस्तुल आणि जिवंत काडतुस होती. चर्चा करीत असताना अचानक एकाकडे असलेल्या पिस्तुलातून गोळी सुटली. ती गोळी आशुतोष गेडाम याला लागल्याने तो जखमी झाला. त्याला भंडारा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर या घटनेचे बिंग फुटल्याने पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात करीत विपीन रामटेके आणि मिथून दहीकर या दोघांना अटक केली. तर आशुतोषवर उपचार सुरू आहे.
गुरुवारी अड्याळ पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ३३८ भा.दं.वि सहकलम ३,२५ भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हा नोंदविला असून पिस्तुल आणि काडतूस जप्त करण्यात आली आहेत. अधिक तपास अड्याळ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बोरकुटे करीत आहेत.