१९ लाखाचे बक्षीस असलेल्या देवरी दलमच्या नक्षल्याचे आत्मसमर्पण

0
17

गोंदिया,दि.२६::नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायात करण्यात तरबेज असलेल्या देवरी दलमचा नक्षल कमांडर लच्छु ऊर्फ लच्छन ऊर्फ सुकराम सोमारू कुमेटी (३९) याच्यावर शासनाने १९ लाखाचे बक्षीस ठेवले होते.परंतु नक्षल चळवळीतील बिकट परिस्थिती पाहून देवरी दलमचा नक्षल कमांडर लच्छु ऊर्फ लच्छन ऊर्फ सुकराम सोमारू कुमेटी (३९) व त्याची पत्नी कमला ऊर्फ गौरी ऊर्फ मेहत्री सामसाय हलामी (३६) या दोघांनी २२ सप्टेंबर रोजी आत्मसमर्पण केले.

जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांच्या समक्ष त्यांनी आत्मसमर्पण केले. माओवाद्यांच्या भूलथापांना आणि प्रलोभनांना बळी पडू नका असे आवाहन गोंदिया पोलिसांनी करीत नक्षलवाद्यांना हिंसेचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामाविष्ट होण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत माओवादी संघटनेत सक्रिय असलेल्या देवरी दलम कमांडर लच्छु ऊर्फ लच्छन ऊर्फ सुकराम सोमारू कुमेटी व देवरी दलम सदस्य कमला ऊर्फ गौरी ऊर्फ मेहत्री सामसाय हलामी यांनी जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या अध्यक्षतेखालील समिती समक्ष आत्मसमर्पण केले आहे.

देवरी दलम कमांडर लच्छु उर्फ लच्छन ऊर्फ सुकराम सोमारू कुमेटी हा सन १९९९ पासून माओवादी संघटनेमध्ये भरती झाला होता. त्याने अबुझमाडमध्ये प्रशिक्षण घेवून स्पेशल झोनल कमेटी मेंबर शेखर ऊर्फ सायण्णा याचे अंगरक्षक म्हणून काम केले. केशकाल दलम, कोंडगाव दलम (छट्टीसगड), कोरची, खोब्रामेंढा (गडचिरोली) तसेच गोंदिया येथील देवरी दलम (महाराष्ट्र) मध्ये उपकमांडर या पदावर काम केले आहे. त्याने नक्षल दलम मध्ये केलेले काम पाहून त्याला देवरी दलमकचे कमांडर पद देण्यात आले होते. त्याच्याविरुद्ध गोंदिया जिल्ह्यात चकमकीचे व जाळपोळीचे एकूण ६ गुन्हे नोंद आहेत.

कमला ऊर्फ गौरी ऊर्फ मेहत्री सामसाय हलामी ही सन २००१ मध्ये खोब्रामेंढा दलममध्ये भरती झाली असून त्यानंतर तिला उत्तर बस्तर व बालाघाट (मध्यप्रदेश) च्या जंगलात पाठवून प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने दलम सदस्य म्हणून कोरची, खोब्रामेंढा, चारभट्टी दलम, प्लाटून- ए (गडचिरोली), गोंदिया येथील देवरी दलममध्ये काम केले आहे. तिच्याविरुद्ध गोंदिया जिल्हयात मारहाण, पोलीस पार्टीवर फायरिंग, जाळपोळ असे एकूण ८ गुन्हे नोंद आहेत.

असे होते दोघांवर बक्षीस

आत्मसमर्पित माओवादी देवरी दलम कमांडर लच्छू ऊर्फ लच्छन ऊर्फ सुकराम सोमारु कुमेटी याच्यावर १६ लाखाचे बक्षीस जाहीर केले होते. तर देवरी दलम सदस्य कमला ऊर्फ गौरी ऊर्फ मेहत्री सामसांय हलामी हिच्यावर ३ लाखाचे बक्षीस होते.

यामुळे केले आत्मसमर्पण

कमला हिची तब्येत बिघडल्याने उपचाराकरीता सुरत येथे पाठविण्यात आले. सुरत येथून परत आल्यानंतर देखील तिची प्रकृती बरी राहत नव्हती. तिला दलम सोडुन जाण्याचा सारखा विचार येत होता. त्यामुळे ती तिचा पती लच्छु याला देखील दलम सोडण्याबाबत वेळोवेळी बोलत असे. शेवटी दोघांनीही दलम सोडण्याचा निर्णय घेतला. दलम सोडल्यानंतर त्यांना पुन्हा नक्षल चळवळीत जायचे नव्हते. त्यामुळे ते आत्मसमर्पण करण्याच्या सतत संपर्कात होते. परंतु त्यांना मदत मिळाली नाही. त्यानंतर ते गोंदिया जिल्हा पोलीसांचे संपर्कात आले व गोंदिया जिल्हा पोलीसांसमक्ष आत्मसमर्पण केले.

शासनाकडून मिळतील ११ लाख रूपये

आत्मसमर्पण केल्यानंतर लच्छू उर्फ लक्ष्मण उर्फ सुखराम कुमेटी यांना महाराष्ट्र शासनाच्या आत्मसमर्पण योजनेंतर्गत बक्षीस म्हणून ३ लाख रूपये व केंद्र शासनाच्या एस.आर.ई. योजने अंतर्गत २ लाख ५० हजार रुपये असे एकुण ५ लाख ५० हजार रुपये तर कमला उर्फ गौरी यांना ४ लाख ५० हजार रुपये, तसेच दोन्ही पती-पत्नी एकत्रित आत्मसमर्पण केल्यामुळे अतिरिक्त १ लाख ५० हजार असे ११ लाख रुपये देण्यात येणार आहे.