परिणय फुके यांच्या वाहनाला भीषण अपघात, थोडक्यात बचावले

0
11

साकोली,दि.१७– माजी मंत्री आणि भंडारा- गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या वाहनाला बुधवारी (दि. १७ एप्रिल) मध्यरात्री राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातातून डॉ. फुके बचावले असून हा अपघात की घातपात अशी शंका घेतली जात आहे.

डॉ. परिणय फुके हे मंगळवारी रात्री भंडारा लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोळदे करडगाव येथे गेले होते. सभा आणि गावकऱ्यांशी चर्चा आटोपून रात्री उशिरा ते लाखनी येथे परत येत असताना रात्री २ वाजताच्या सुमारास साकोली जवळ एक अज्ञात वाहन डॉ. फुके यांच्या वाहनासमोर आले पण त्यांच्या चालकाने समयसूचकता दाखवली. त्यामुळे ही धडक टळली. पण त्यामागे असलेले त्यांच्या ताफ्यातील एक वाहन महामार्गावरील दुभाजकावर आदळले. यात या गाडीचे प्रचंड नुकसान झाले. वाहनातील सुरक्षा रक्षक आणि इतर सहकाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली. सबंधित अज्ञात वाहन नंतर पळून गेले. चालकाने प्रसंगावधान राखल्याने डॉ. फुके या भीषण अपघातातून बचावले.