*महसूल पथकाच्या अंगावर घातला ट्रॅक्टर; जेसीबीसह २ ट्रॅक्टर जप्त, तिघांवर कारवाईचा बडगा*
कुही- तालुक्यातील बोरी नाईक परिसरात मध्यरात्री सुरू असलेल्या अवैध मुरूम उत्खननावर महसूल विभागाने धाडसी कारवाई केली*. या कारवाई दरम्यान नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे यांनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता चक्क धावत्या जेसीबीला लटकून ३ ते ४ किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. या थरारात महसूल पथकाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना जीवे मारण्याचाही प्रयत्न झाला, मात्र प्रशासनाने मोठ्या धैर्याने एक जेसीबी आणि दोन ट्रॅक्टर जप्त केले आहेत.
बोरी नाईक शिवारात अवैधरित्या मुरूम उपसा सुरू असल्याची माहिती मिळताच ५ मे रोजी रात्री ११:३० च्या सुमारास नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे. यांनी पथकासह छापा टाकला. यावेळी घटनास्थळावरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका ट्रॅक्टर चालकाने थेट नायब तहसीलदारांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न केला. निकाळजे यांनी बाजूला उडी मारल्याने त्यांचा जीव वाचला, मात्र अंधाराचा फायदा घेत तो चालक पसार झाला.
जेसीबीला लटकून मृत्यूशी झुंज
याच वेळी MH40 CQ 2388 क्रमांकाचा जेसीबी वेगाने पळू लागला. निकाळजे. यांनी त्याला थांबवण्याचा इशारा केला, पण चालकाने वेग अधिकच वाढवला. डगमगून न जाता निकाळजे यांनी धावत्या जेसीबीला पकडले आणि त्याला लटकले. चालकाने त्यांना खाली पाडण्यासाठी वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या काटेरी झुडपांना खेटून चालवले. यामध्ये निकाळजे यांचा शर्ट फाटला आणि त्यांच्या हाताला जखमाही झाल्या. तब्बल ३-४ किलोमीटरपर्यंत मृत्यूशी झुंज देत त्यांनी आपली पकड सोडली नाही. अखेर समोरून पोलीस पथक येताना दिसताच चालकाने जेसीबी थांबवला.
अवैध उत्खननात गुंतलेली खालील वाहने जप्त:
१. जेसीबी (MH40 CQ 2388): चालक मयूर थोटे (रा. दहेगाव, सध्या रा. राजोला) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
२. ट्रॅक्टर १ (MH40 CX 6918): मालक मनोहर निरगुडकर (रा. बोरी नाईक).
३. ट्रॅक्टर २ (MH40 CQ 0544): मालक जयपाल पंढरी तुळसकर (रा. बोरी नाईक).
या थरारक मोहिमेत नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे यांच्यासोबत ग्राम महसूल अधिकारी मोहन पवार, आनंद मस्के, महसूल सेवक निलेश तिरपुडे आणि वेलतूर पोलीस स्टेशनचे एपीआय राऊत व त्यांचे कर्मचारी सहभागी होते. या धडाकेबाज कारवाईमुळे कुही तालुक्यातील अवैध उत्खनन करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहेत. संबंधित वाहन मालक आणि चालकांविरुद्ध कठोर कायदेशीर प्रक्रिया प्रशासनाकडून राबवण्यात येत आहे.





