25.7 C
Gondiā
Tuesday, July 28, 2026
Home गुन्हेवार्ता गोंदियात अग्रवाल गुरुजीचे विकृत कृत्य; अल्पवयीन मुलीचा विनयभंग, संतप्त ग्रामस्थांची पोलिसांत धाव

गोंदियात अग्रवाल गुरुजीचे विकृत कृत्य; अल्पवयीन मुलीचा विनयभंग, संतप्त ग्रामस्थांची पोलिसांत धाव

0
342

गोंदिया :विद्यार्थिनींना घडवणाऱ्या शिक्षकानेच पुन्हा एकदा गुरू-शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासल्याचा धक्कादायक प्रकार गोंदिया तालुक्यात उघडकीस आला आहे. गोंदिया पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या लंबाटोला(गिरोला) ोयेथील प्राथमिक शाळेतील शिक्षक संजय अग्रवाल याने एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट पसरली असून, संतप्त ग्रामस्थांनी रावणवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली आहे.दरम्यान गोंदिया पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एम.एल.मेश्राम यांना यासंदर्भात विचारणा केली असता पोलीस कारवाई पुर्ण झाल्यानंतर तसेच पंचायत समितीला तक्रार आल्यानंतर सदर शिक्षकाच्या निलबंनाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.

यापूर्वीही डांगोरलीत नोंदवला होता गुन्हा
संशयित आरोपी शिक्षक संजय अग्रवाल याच्या विकृत वर्तनाची ही पहिलीच वेळ नसून, यापूर्वी तालुक्यातील डांगोरली येथे कार्यरत असतानाही त्याच्यावर अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पहिल्या घटनेनंतरही त्याच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झाली नसल्याने आणि प्रशासनाने कठोर कारवाई न केल्यानेच त्याने पुन्हा असे कृत्य धाडस दाखवल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.

रावणवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
लंबाटोला(गिरोला) येथील अल्पवयीन मुलीसोबत झालेल्या या प्रकारानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी तातडीने रावणवाडी पोलीस ठाणे गाठले. या विकृत शिक्षकावर तात्काळ कठोर कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला तत्काळ अटक करण्यात यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, पोलीस या प्रकरणी पीडित मुलगी व तिच्या पालकांचा जबाब नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी
वारंवार विनयभंगासारखे गंभीर गुन्हे दाखल होऊनही संबंधित शिक्षक सेवेत कसा? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. शिक्षण विभागाने या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित शिक्षकाला तात्काळ सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी लंबाटोला(गिरोला) येथील ग्रामस्थांसह पालकांकडून केली जात आहे.