रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाचा अपघाती मृत्यू

0
6

नागपूर,दि.22 – शंटिंगदरम्यान मालगाडीच्या इंजिनने धडक दिल्याने रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर अजनी यार्डमध्ये घडली. अजनी येथे मानवंदना अर्पण केल्यानंतर सन्मानाने मृतदेह तेलंगणा एक्‍स्प्रेसने त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात आला.महेंद्रसिंह यांचे मे महिन्यात लग्न झाले होते. मात्र, काळाने झडप घातल्याने मीना कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती निघून गेली. त्यांच्या पश्‍चात पत्नी, आईवडील, बहीण, भाऊ आहेत.

रविवारी रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ सुरक्षा आयुक्त ज्योतीकुमार सतीजा यांच्या उपस्थितीत मीना यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर दुपारी तेलंगणा एक्‍स्प्रेसने त्यांचा मृतदेह पूर्ण सन्मानाने रवाना करण्यात आला. रेल्वेने प्रथम आग्रा येथे आणि तिथून रस्ता मार्गाने मृतदेह राजस्थानमधील त्यांच्या मूळ गावी पोहोचवण्यात येईल. मनमिळाऊ स्वभावाचे महेंद्रसिंह यांच्या निधनाने रेल्वे सुरक्षा दलाच्या वर्तुळात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृतदेह गावी रवाना करण्यासाठी त्यांचे संपूर्ण सहकारी रेल्वेस्थानकावर हजर होते.