नगरसेवक मसराम मृत्यूप्रकरणाची सीबीआय चौकशी करा

0
13
ष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेची मागणी;पोलिस अधीक्षकांना निवेदन
गोंदिया ,दि.०८ः-: अर्जुनी मोरगाव नगरपंचायतीचे नगरसेवक माणिक मसराम यांचा २१ मे रोजी मृत्यू झाला होता. या घटनेत राजकीय दबावाखाली नगरसेवक देवेंद्र टेंभरे यांना गोवण्यात आले. तेव्हा, प्रकरणाची सीबीआय चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेच्या वतीने आज (दि.८) जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांना निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली.
अर्जुनी मोरगाव नगरपंचायत अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी २१ मे रोजी नामांकन दाखल करावयाचे होते. अध्यक्षपदासाठी मसराम यांच्यासह देवेंद्र टेंभरे व विजय कापगते हे इच्छुक होते. परंतु, २० मेच्या रात्रीला मसराम यांचा मृत्यू झाल्याने हा मृत्यू अपघात की घातपात? असा संश निर्माण झाला. या प्रकरणी पोलिसांनी नगरसेवक देवेंद्र टेंभरे यांना अटक केली. जेव्हा की, मसराम यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीत टेंभरे यांच्यासह यशकुमार शहारे, माणिक घनाडे, विजय कापगते व उमाकांत ढेंगे यांच्यावरही संशय व्यक्त केला होता. परंतु, पोलिसांनी टेंभरे यांनाच अटक केली. तेव्हा, मसराम यांच्या पत्नीने संशय व्यक्त केलेल्या व्यक्तिंचीही चौकशी व्हावी, तसेच संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करून प्रकरणाचा छडा लावावा, अशी मागणी राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
निवेदन देतेवेळी महासभेचे महासचिव मुरलीधर टेंभरे, रोशनलाल बोपचे, दिलीप पटले, अ‍ॅड. रुपेंद्र कटरे, नंदूभाऊ रहांगडाले, जगदीश येडे यांच्यासह महासभेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ यांनी शिष्टमंडळाला निष्पपणे चौकशी होईल, असे आश्वासन दिले.