तक्रारकर्त्यालाच सुनावली दोन वर्षांची शिक्षा

0
15

गोंदिया ,दि.20ः: जिल्ह्यात २९ वर्षापूर्वी दरोडा प्रकरणात तक्रार करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना दिलेल्या बयानावर कायम न राहता न्यायालयात साक्ष देताना बयान बदलल्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी सहदिवाणी न्यायाधीश तिसरे यांनी फितूर झालेल्या तक्रारकर्त्यालाच दोन वर्षाचा सश्रम कारावास सुनावला आहे. हा महत्वपूर्ण निर्वाळा सोमवारी (दि.१८) रोजी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी सहदिवाणी न्यायाधीश तिसरे अ. श्री. जरोदे (उजवणे) यांनी दिला आहे.तक्रारकर्त्याला खोटी साक्ष देणे महागात पडले असून तक्रारकर्त्यालाच दोन वर्षाची शिक्षा झाल्याचे हे गोंदिया जिल्ह्यातील पहिलेच प्रकरण असल्याचे वकील मंडळींचे म्हणणे आहे.
नरेश जेठानंद मेघवानी (५१) रा. माताटोली गोंदिया असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. सोडा फॅक्ट्री चालविणाºया नरेश मेघवानी यांनी ९ जानेवारी १९८९ ला सायंकाळी ७.३० वाजता सिंधी कॉलनीतील राजू नचमल कहीथी व लक्षमण उर्फ घोडा आकवानी यांनी बळजबरीने ६० रूपये आपल्या जवळून हिसकावून नेले होते अशी तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या आधारावर गोंदिया शहर पोलिसात अपराध क्र.६/८९ चे कलम ३९२,३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचे दोषारोपपत्र न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने साक्ष घेण्यासाठी नरेश मेघवानी यांना बोलाविले. त्यावेळी मेघवानी यांनी पोलिसांना दिलेले बयान वेगळेच व न्यायालयात सदर बयान बदलले. त्यावेळी हे प्रकरण प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी दुसरे सुधाकर यार्लागड्ड यांच्याकडे होते. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. प्रशांत डोये यांनी नरेश मेघवानीची उलट तपासणी केली होती. त्यात मेघवानी फितूर झाला असे लक्षात आल्यावर न्यायाधीश यार्लागड्ड यांनी स्वत: लक्ष घालून फितूर झालेल्या मेघवानी यांच्याविरूध्दच न्यायालयात खटला चालविला. या खटल्यात अ‍ॅड. प्रशांत डोये, अ‍ॅड. क्रिष्णा पारधी, अ‍ॅड. मुकेश बोरीकर यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले. न्यायालायात दोन साक्षदार तपासण्यात आले. अ‍ॅड. मुकेश बोरीकर यांनी या प्रकरणातील वास्तव व तक्रारकर्ताच कसा फितूर झाला असे न्यायालयाला सांगितल्याने प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी सहदिवाणी न्यायाधीश तिसरे अ.श्री. जरोदे (उजवणे) यांनी आरोपीला शिक्षा सुनावली. २ वर्षाचा सश्रम कारावास व ५ हजार रूपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास एक महिन्याचा साधा कारावास सुनावला आहे.