लाचखोर लिपिकास २५ हजारांची लाच घेताना अटक

0
5

चंद्रपूर,दि.06ः- शेतजमिनीची हिस्सेवाटणी करून अंतिम आदेश देण्यासाठी शेतकर्‍यांकडून २५ हजाराची लाच घेणारा भिसी अप्पर तहसील कार्यालयातील लाचखोर कनिष्ठ लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा पथकाने रंगेहाथ अटक केली. संकेत भगतसिंह बडगये (२४)असे लिपिकाचे नाव आहे. ही रक्कम तहसिलदार व नायब तहसिलदार यांचा मागणीनुसार स्वीकारल्याचे आरोपीने सांगितले असल्याने त्यामुळे त्या दोघांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले.
सदर घटनेचा तक्रारकर्ता ब्रम्हपुरी तालुक्यातील लोहारा येथील वडिलांच्या मृत्यूनंतर अर्जदाराचे वडिलांनी सदर शेतजमिनीची वाटणी बहिणीचे व तक्रारकर्त्याचे नावाने हिस्से मिळण्याकरिता अप्पर तहसील कार्यालय भिसी येथे अर्ज केला. सदर प्रकरणाचा अंतिम आदेश मिळण्याकरिता भिसी येथील कनिष्ठ लिपिक संकेत बडगये याने या कामासाठी तहसिलदार तसेच नायब तहसिलदार यांचे नाव समोर करून ३0 हजार रुपयांची मागणी केली. दरम्यान शेतकर्‍याची देण्याची इच्छा नसल्याने त्याने याबाबत ३ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर यांचेकडे लेखी तक्रार दाखल केली. तडजोडीअंती २५ हजार देण्याचे ठरले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा पथकाने मंगळवारी भिसी अप्पर तहसील कार्यालयात येऊन पडताळणी केली यावेळीही संकेत बडगये याने तहसिलदार व नायब तहसिलदार यांचे नाव समोर करून तडजोडीअंती २५ हजाराची मागणी केली.त्यामुळे बुधवारी ४ जुलै रोजी पथकाने यशस्वी सापळा रचून कनिष्ठ लिपीकाला लाचेची सदर रक्कम स्वीकारतांना अटक केली.
सदर कारवाही पो.नि.सचिन म्हेत्रे,पो.शि.मनोहर एकोणकर, सुभाष गोहोकर, संतोष येलपुलवार, रवीकुमार,ढेंगळे,राहुल ठाकरे यांनी केली.