माजी सैनिकांने ११ जणांची केली २५ लाखांने फसवणूक

0
22

देसाईंगज(वडसा)दि.28ः- रिक्रुटमेंट ऑफ आसाम रॉयफल येथे नोकरी लावून देतो म्हणून परिसरातील ११ सुशिक्षित बेरोजगार युवकांकडून प्रत्येकी अडीच ते तीन लाख रुपये घेऊन युवकांना तब्बल २५ लाख रुपयांनी फसविल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.कुरूड येथील रहिवासी सेवानिवृत्त माजी सैनिक जनार्धन जैराम बगमारे (५६), पत्नी अहिल्या बगमारे (५0), मुलगा पवन बगमारे (२९) यांच्यावर पिडितांनी पत्रपरिषेतून आरोप केला असून दोन वर्ष लोटूनही पैसे देण्यास माजी सैनिक जनार्धन बगमारे टाळाटाळ करीत असल्याची माहिती दिली.
पीडितांनी सांगितले की, देसाईगंज व नजिकच्या परिसरातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना नोकरीचे आमिष दाखवून व स्वत: माजी सैनिक असल्याने माझे रिक्रुटमेंट ऑफ आसाम रॉयफल येथील वरिष्ठांशी चांगले संबंध असल्याचे सांगितले.आणि देसाईगंज येथील भारत गोविंदा नाकतोडे, मंगेश मधुकर राऊत, सुरज शामराव शेंडे, कुरूड येथील प्रमोद दादाजी झुरे, मनोज महादेव ढोरे, प्रफुल शंकर सिंगारे, आमगाव येथील प्रलय ज्ञानेश्‍वर मिसार, चिखलगाव ता. ब्रम्हपुरी येथील प्रदिप नारायण ढोंगे, बोंडगाव देवी ता. अर्जुनी (मोरगाव) येथील राजेंद्र लालाजी मेश्राम, सुमित पांडूरंग फाये, कुनघाडा रै. ता. चामोर्शी येथील शेषराज बारीकराव सुरजागडे या युवकांकडून अडीच ते तीन लाख रूपये नगदी घेतले. त्यांना ९ जून २0१६ रोजी आसाम रॉयफल ट्रेनिंग सेंटच्या कमांडंटच्या स्वाक्षरी व निशानी शिक्का मारलेले पत्र दिले.
दरम्यान, माजी सैनिकाचा मुलगा पवन याने सर्व युवकांना घेऊन आसाम राज्यातील जोराहट येथे गेला. तेथे ट्रेनिंगच नाही तर धड राहणे, खाण्यापिण्याची व्यवस्था नसल्याने युवकांनी घर गाठले. त्यानंतर तुमची सहा महिन्यांची ट्रेनिंग घेतल्या जाईल असे पत्रसुध्दा तुम्हाला मिळणार असल्याचे माजी सैनिकाने युवकांना बजावले. तब्बल दीड वर्ष लोटूनही सहा महिन्यांच्या ट्रेनिंगकरीता अद्यापही न बोलविल्याने युवकांना आपली फसवणूक झाल्याचे कळले. याबाबत युवकांनी माजी सैनिक बगमारे यांचे घर गाठून एकतर नोकरी लावून द्या किंवा दिलेले पैसे परत करा, असा तगादा लावला. आज देतो, उद्या देतो असे म्हणून बगमारे टाळाटाळ करायला लागले. युवकांनी पालकांना घेऊन गेल्यावर जनार्धन बगमारे यांनी पैसे परत करण्याचा करारनामा १00 रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर ३0 मार्च २0१७ ला लिहून दिला. परंतु पैसे मिळाले नाही. त्यामुळे सदर युवकांनी ६ मार्च २0१८ ला देसाईगंज पोलिस ठाणे गाठून बगमारे कुटुंबीयाविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिघांविरुध्द भादंवि ४२0,४0६, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. मात्र, गुन्हा दाखल होऊनसुध्दा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल न झाल्याने पोलिसांनी हयगय न करता न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करावे, अशी मागणी पीडित युवकांसह पालकांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.