जनावरे कोंबून नेणार्‍या वाहनांचा परवाना निलंबित

0
29

गोंदिया,दि.05ः- जनावरांना कोंबून वाहतूक करणार्‍या वाहनांवर पोलिस विभागाकडून नियमित कारवाई केली जाते. मात्र, या प्रकारावर पूर्णत: आळा बसत नसल्याने जिल्हा पोलिस अधीक्षकांनी जनावरांची अवैध पद्धतीने वाहतूक करणार्‍या वाहनांवर निलंबनाची कारवाई व्हावी यासाठी पुढाकार घेतला. दरम्यान, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडे ३५ वाहनांवर निलंबनाची कारवाई करण्यासाठी शिफारस करण्यात आली. यानुरूप गोंदिया उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी ६ वाहनांवर निलंबनाची कारवाई केली आहे. निलंबित करण्यात आलेल्या वाहनांना पोलिस ठाण्यात उभे करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
जिल्ह्यात सर्व अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिसांनी कंबर कसून कारवाईचे धाडसत्र सुरू केले आहे. हेल्मेटसक्ती, सीट बेल्टसक्ती, अवैध दारू विक्री, जुगार, वरली मटका आदी प्रकारावर आळा घालण्यासाठी पोलिस विभागाकडून सक्तीची कारवाई केली जात आहे. त्यातच जनावरांची अवैध पद्धतीने वाहतूक करणार्‍या वाहनांवरही कारवाई होत आहे. परंतु, कारवाईनंतरही मोठय़ा प्रमाणात जनावरे कोंबून वाहून नेण्याचा प्रकार पहावयास मिळतो. यावर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिस विभागाने वाहनांनाच निलंबित करण्यासाठी कारवाई व्हावी याकरिता आता पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यात विविध पोलिस स्टेशनहद्दीत प्राणी संरक्षण अधिनियमअंतर्गत कारवाई करण्यात येऊन एकूण ३५ वाहनाचे चालक व मालकांविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आले. त्या ३५ वाहनांचा कायमस्वरुपी परवाना रद्द करण्यात यावा, अशी शिफारस उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली. यावर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने निलंबन कारवाईची प्रक्रिया सुरू केली असून त्यातील ६ वाहनांना निलंबित केले आहे. वाहन क्र.एमएच ३५/के ४१९२, वाहन क्र.एमएच १९/झेड ४४0१, वाहन क्र.एमएच ३५/के ४३१३, वाहन क्र.एमएच ३५/के ८३४, वाहन क्र.एमएच ३५/पी ६६१८, वाहन क्र.एमएच ३५/के ५३१३ या वाहनांचा परवाना मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम ८६ अंतर्गत ९0 दिवसांकरिता निलंबित करण्यात आला आहे.
सदर वाहनांचा निलंबन कालावधीत म्हणजेच २0 नोव्हेंबर ते १७ फेब्रुवारीपयर्ंत असून संबंधित पोलिस स्टेशनमध्ये निलंबन कालावधीपयर्ंत वाहन जमा करण्यात आले आहे. तसेच वाहन मालकास वाहनाचे निलंबन कालावधीत नोंदणी प्रमाणपत्र त्यांच्या कार्यालयात जमा करण्यात यावे, असेही निर्देशित करण्यात आले आहे.