सेजगावचे तलाठी नेवारे एसीबीच्या जाळ्यात

0
16

गोंदिया,दि.22ः- मातीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न केल्याचा मोबदला म्हणून १० हजारांची मागणी करणाऱ्या सेजगावच्या तलाठ्याला पहिल्या हप्त्यातील ३ हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. ही कारवाई शुक्रवारी (दि.२२) एकोडी येथे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली.देवेंद्र टोलीराम नेवारे ( वय ३५) असे या तलाठ्याचे नाव आहे.
यातील तक्रारदार हे ट्रॅक्टरने मातीची वाहतूक करीत असताना तलाठी नेवारे याने तो ट्रॅक्टर पकडला. त्यानंतर, वर्षभर कारवाई न करण्यासाठी त्याने तक्रारदाराला १० हजार रुपयांची मागणी केली. नाईलाजास्तव तक्रारदाराने त्यावेळी दोन हजार रुपये तलाठी नेवारे याला दिले. उर्वरित रक्कम नंतर देतो, असे तक्रारदार म्हणाला. त्यामुळे नेवारे याने ट्रॅक्टर सोडला. दरम्यान, काही दिवसाने पुन्हा त्याने आठ हजार रुपये द्यावे, यासाठी तगादा लावला. ही रक्कम एकमुस्त देण्याचे शक्य नसल्याचे तक्रारदाराने त्याला सांगितले. यावर त्याने प्रतिहप्ता ३ हजार रुपये देण्यास बजावले. तथापि, ही रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पथकाने सापळा रचला. यावेळी तीन हजार रुपयांची लाच घेताना नेवारे याला अटक केली. आरोपीविरुद्ध गंगाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.