जांभरुण महाली येथे वॉटर एटीएमची उभारणी

0
46

वाशिम, दि. २२ : अटल महापणन विकास अभियानअंतर्गत जांभरुण महाली येथील सेवा सहकारी संस्थेने दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वाशिम शाखेच्या सहाय्याने वॉटर एटीएमची उभारणी नुकतीच केली असून हा प्रकल्प सेवा सहकारी संस्थांना नवी दिशा देणारा ठरेल, असे मत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आर. एन. कटके यांनी व्यक्त केले. वॉटर एटीएम प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य होते.

यावेळी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाचे अधीक्षक जी. बी. राठोड, श्री. पाटील, श्री. तलवारे, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग महाले, ज्ञानेश्वर अवचार, जिल्हा व्यवसाय विकास व पणन व्यवस्थापक महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन व नीलकंठ सुरेकर यांच्यासह पणन मंडळाचे कर्मचारी व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.

श्री. कटके म्हणाले, शासनाच्या अटल महापणन विकास अभियानाचा वाशिम जिल्ह्यात जास्तीत जास्त सेवा सहकारी संस्थांनी फायदा घ्यावा. तसेच कर्ज पुरवठादार संस्थांच्या माध्यमातून किंवा स्वबळावर नवीन उद्योगाची उभारणी करून संस्थेचा व सभासदांचा नफा वाढवावा व रोजगार निर्मिती करावी, तसेच सेवा सहकारी संस्थांना शासनाच्या प्राथमिक कृषि पतपुरवठा संस्था सक्षमीकरण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या निधीतून त्या संस्थामार्फत वाशिम जिल्ह्यात नवीन व्यवसाय उभारणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.श्री. महाले म्हणाले, वॉटर एटीएम प्रकल्प चांगल्या प्रकारे चालवून जिल्ह्यात एक आदर्श निर्माण करण्याचा आमच्या संस्थेचा प्रयत्न राहणार आहे.