33 C
Gondiā
Saturday, June 20, 2026
Home गुन्हेवार्ता सुरेश यादव हत्या प्रकरणात ७ आरोपींना अटक

सुरेश यादव हत्या प्रकरणात ७ आरोपींना अटक

0
63

गोंदिया,दि.21ः-शहरातील पिंडकेपार मार्गावरील एफ.सी.आय. गोदामामागे १४ फेब्रुवारी रोजी सुरेश वैशाखू यादव (५१, सिंधी कॉलनी) यांची हत्या झाली होती. याप्रकरणी पोलीसांनी ७ आरोपीसह देशी कट्टा विक्रेत्याला अटक केली आहे. आरोपींकडून हत्तेत वापरलेला देशी कट्टा, २ जिवंत गोळ्या व २ दुचाकी जप्त केल्या आहेत.
सुरेश यादव हे सायंकाळी ७ च्या सुमारास आपल्या शेतात काम करीत असतांना ६ ते ७ संख्येत आलेल्या आरोपींनी त्यांना मारहाण केली व एका आरोपीने देशी कट्टयातुन त्याच्यावर गोळी घातली. घटने नंतर आरोपी फरार झाले. तर यादव यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत असतांना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. दरम्यान शहर पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. विशेष म्हणजे, सुरेश यादव यांचा मुलगा गोलू यादव याने ९ महिन्यापूर्वी शहरातील मुरली शर्मा या युवकाचा खून केला होता. याप्रकरणी गोलू यादव व त्याचे सहकारी भंडारा कारागृहात आहेत. त्यामुळे मुरली शर्मा हत्या प्रकरणाचा बदला घेण्याच्या उद्देशाने सुरेश यादव यांची हत्या तर झाली नसावी, या दिशेने शहर पोलीस व स्थानीक गुन्हे शाखेने तपास सुरु केला. आरोपीचा शोध घेण्यासाठी बालाघाट, तुमसर, नागपूर व नाशिक येथे तपास पथक पाठवण्यात आले. दरम्यान १५ फेब्रुवारी शहरातील सावरटोली येथून राजा महेश सांडेकर याला ताब्यात घेतले. तर १६ फेब्रुवारी रोजी नरेश नेतराम नागपूरे रा. कृष्णपुरा वार्ड, दुर्गेश उर्फ डॅनी रमेश खरे रा. वसंत नगर व धीरज ऊर्फ भोला मुन्नालाल ऊके रा. वसंत नगर यांना शहर व बालाघाट परिसरातून ताब्यात घेतले. १७ फेब्रुवारी रोजी आमगाव परिसरातून मोहित दिलीप मराठे रा. संजय नगर व अजय दिपक बंसोड रा. गड्डाटोली यांना अटक केली. तर १९ फेब्रुवारी रोजी नारायण संतोष शर्मा रा. कृष्णपुरा वार्ड याला बालाघाट जिल्ह्यातील किरणापूर येथून अटक केली. पोलीसांनी आरोपींजवळून हत्येत वापरलेला देशी कट्टा,२ जीवंत काडतूस व २ दुचाकी जप्त केल्या आहेत. तसेच आरोपींनी ज्याच्याकडून हत्येसाठी देशी कट्टा विकत घेतला होता, त्यालाही पोलीसांनी अटक केली आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, कैलास गवते, विवेक नार्वेकर, नितीन सावंत, विजय राणे, पोलीस निरीक्षण तेजेंद्र मेर्शाम, पोलीस कर्मचारी लिलेंद्र बैस, गोपाल कापगते, राजेश बढे, चंद्रकांत कर्पे, विजय रहांगडाले, सुखदेव राऊत, राजु मिर्शा, घनश्याम थेर, रविकांत दराडे, भुवनलाला देशमुख, दिक्षीतकुमार दमाहे, विनय शेंडे, संजय मारवाडे, प्रभाकर पालांदूरकर, विनोद बरैया, धनंजय शेंडे, मोहन शेंडे, रॉबिन साठे, रेखलाल गौतम, अजय रहांगडाले, रवि राठोड, तुलसीदास लुटे, सुबोध बिसेन, छगन विठोले, भुमेश्‍वर जगनाडे, चित्तरंजन कोडापे यांनी केली.