दहावीची परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याचा खून

0
608

गोंदिया,दि.0४: दहावीची परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या १७ वर्षाच्या मुलावर चाकूने प्राणघातक हल्ला करून त्याचा खून केल्याची घटना ३ मार्चच्या सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास गोंदिया तालुक्याच्या मोरवाही येथे घडली. अतुल अशोक तरोणे (१७) रा.मोरवाही असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. मंगळवारी दहावीचा मराठीचा पेपर असल्याने तो पेपर देण्यासाठी गेला होता. पेपर देऊन घरी परतत असताना त्याला त्याच्या घरापासून ४०० ते ५०० मीटर अंतरावर असलेल्या एका गव्हाच्या शेतात त्याच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्याच्या डोक्यावर, शरीरावर चाकूचे घाव मारले. या घटनेची वाच्यता त्याने कुणाकडे करू नये म्हणून त्याची जीभही कापण्यात आली आहे. रक्ताच्या थारोळ््यात पडलेल्या त्या मुलाला उपचारासाठी गोंदियाच्या एका खासगी रूग्णालयात नेण्यात आले होते. परंतु उपचारही कामी आला नाही. सायंकाळी ७.३० वाजता त्याचा मृत्यू झाल्याने त्याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यासाठी त्याला गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शवविच्छेदनगृहात ठेवण्यात आले. जुन्या वैनमस्यातून त्याचा खून झाल्याची चर्चा गावात होती. परंतु मारेकरी कोण याची माहिती मिळू शकली नाही. सदर घटनेसंदर्भात गोंदिया ग्रामीण पोलिसांनी रात्री उशीरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे