ठाणेदारांच्या रायटरसह दोघे एसीबीच्या जाळ्यात

0
528

उमरखेड ,दि.15ः- फसवणुकीची बनावट तक्रार देऊन गुन्हे दाखल करण्याची धमकी देत येथील शहर पोस्टेचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांचा रायटर शिवशंकर वायाळ व एका साथीदाराने अडीच लाखांची लाच मागितल्याप्रकरणी अकोला येथील लाचलुचपत विभागाने दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
येथील शहर पोस्टेचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांचा रायटर शिवशंकर सखाराम वायाळ याने राजेश झिने (खासगी इसम) यांनी शेगाव येथील एका ६0 वर्षीय वृध्दास त्यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना भीती दाखवून साडेसात लाख रुपये लाचेची मागणी केली होती, अशी तक्रार तक्रारदाराने अकोला एसीबीकडे केली आहे. तक्रारीवरून एसीबीच्या अधिकार्‍यांनी २७ जानेवारी रोजी शहानिशा केली असता रायटर शिवशंकर वायाळ यांनी तक्रारदारास त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी अडीच लाख रुपये मागणी केल्याचे निष्पन्न झाले. परंतु, उपरोक्त दोन्ही लाचखोरांना तक्रारदारावर संशय आल्याने त्यांनी लाच घेण्याचे टाळले. तसेच घटनास्थळावरून फरार झाले होते,मात्र त्यांना ताब्यात घेण्यात आले.
येथील पोलिस प्रशासनाचे बडे अधिकारी व कर्मचार्‍यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अमरावती, यवतमाळ व वाशीम अशा तीन जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या संयुक्त पथकाने एकाचवेळी सापळा रचून रंगेहात पकडले आहे. या धाडसत्रामुळे पोलिस प्रशासनासह कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.
अमरावती, यवतमाळ आणि वाशीम येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माहितीवरून आणि फिर्यादीच्या तक्रारीवरून उमरखेड शहरात सापळा रचून पोलिस विभागाचे अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर कारवाई केल्याची घटना १४ मार्च रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली आहे. विशेष म्हणजे पोलिस विभागावर झालेली ही कारवाई जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात होते. याशिवाय जिल्हा पोलिस अधीक्षक, एलसीबीप्रमुख हेसुद्धा शनिवारी उमरखेड तालुक्याच्या दौर्‍यावर होते. ते परतल्यानंतर ही सापळा कारवाई घडली अन्यथा जिल्हा पोलिस अधिकार्‍यांनासुद्धा एसीबीची धाड अनुभवता आली असती, असे बोलले जात आहे