गडचिरोली: तेलंगणा राज्यातून नदीमार्गे गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात प्रवेश करणाऱ्या ३४ जणांवर सिरोंचा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.जिल्हा पोलिसांनी टाळेबंदीच्या काळात ठिकठिकाणी करडी नजर ठेवली आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. तरीही नियमांचे उल्लंघन होतच आहे. संचारबंदी लागू झाल्यापासून आतापर्यंत नियमभंग करणाऱ्या ५३०८ वाहनांवर कारवाई केली असून, २५०४ वाहने जप्त करण्यात आली आहे. या वाहनधारकांकडून १६ लाख ४२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शिवाय नियम न पाळणाऱ्या ११८ नागरिकांवर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून, २१ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.




