26.3 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home गुन्हेवार्ता मुलाचा आकस्मिक मृत्यू नसून मित्रांनीच संगनमताने केला खून-सुभाष डोंगरवार

मुलाचा आकस्मिक मृत्यू नसून मित्रांनीच संगनमताने केला खून-सुभाष डोंगरवार

0
1595

अर्जुनी मोरगाव दिं.6.ः चिचगड पोलीस स्टेशन अंतर्गत 2 एप्रिल रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद असलेल्या विशाल सुभाष डोंगरवारचा आकस्मिक मृत्यू नसून त्याच्या पाच मित्रांनी संगनमताने खूनच केल्याचा आरोप मृतक विशालचे वडील सुभाष प्रल्हाद डोंगरवार यांनी केला आहे. याबाबतची तक्रार आपण 18 एप्रिल उपविभागीय पोलिस अधिकारी देवरी यांना तसेच चिचगड पोलीस स्टेशनला दिल्याची माहिती डोंगरवार यांनी दिली आहे. दीड महिन्याचा कालावधी लोटूनही पोलिसांनी कुठलीही चौकशी केली नाही.पोलीस आपल्या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप करीत तंटामुक्त समितीचा अध्यक्ष असून सुध्दा मलाच न्याय मिळत नाही,तर इतरांनाही काय न्याय मिळत असेल असा प्रश्न सुभाष डोंगरवार यांनी पत्रपरिषदेतून उपस्थित केला आहे.
2 एप्रिलला मृतक विशालचा मित्र नेतराम वाढईने आपल्या स्वतःच्या घरची भांडे नेऊन माझ्या मुलाला मोबाईल संदेशाद्वारे बोलावून झाशीनगर पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या इटियाडोह धरणाकडे नेले. त्याठिकाणी  मित्रांनी पार्टी केली व आपल्या मुलाला पाण्यात बुडवून जीवे मारले असे सुभाष डोंगरवार यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी व जिल्हा पोलीस अधिक्षक गोंदिया यांना दिलेल्या लेखी तक्रारीतून केला आहे. मुलाचा खून केलेल्या आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणीही केली आहे .मृतकाचे मित्रामध्ये अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोदरा येथील तीन, येरंडी देवलगाव येथील एक व झाशीनगर येथील एकाचा समावेश आहे. विशालचा झाशीनगर येथील स्थानिक मित्र नेतरामशी घटनेच्या एक आठवडा आधी भांडण झाले होते. घटनास्थळावर मृतक विशालचे शरीरावरील कपडे अस्ताव्यस्त फेकले होते. मोबाईल फोन एरोप्लेन मोड वर टाकण्यात आलेला होता. मोबाईल मधील फोटो डिलीट केलेली होती नेतरामला मृतक विशालच्या मोबाईलचे पूर्ण पासवर्ड माहित होते,असे तक्रारीत म्हटले आहे. घटनास्थळावरील पाण्यातून प्रेत बाहेर काढण्यात आले. तेव्हा मृतकाच्या नाकातून रक्त वाहत होते. 17 तास पाण्यात राहून सुद्धा शरीरावर सूज आलेली नव्हती. चेहरा काळा पडलेला होता. डोक्यामधूनही रक्ताचे थेंब आढळून आले होते. घटनेच्या दिवशी त्या मित्रांची मोटर सायकल बंद पडल्यामुळे बोदरा येथील तीन व येरंडी देवलगाव येथील मित्रांना नेतरामने नवेगावबांध येथे पोहोचून दिले होते. दोन- चार दिवसानंतर नेतराम वाढई याने गावात प्रतिष्ठित व्यक्ती समोर व स्वतः माझ्यासमोर बोदरा व येरंडी देवलगाव येथील मित्रांनी संगनमत करून मृतक विशालला पाण्यात बुडवून पाठीवर व डोक्यावर हाताच्या बुक्क्यांनी मारहाण करून त्याला पाण्यात बुडवून जीवे मारण्यात आले असे सांगितले. ही गोष्ट जर गावात दुसऱ्यांना सांगितलीस तर तुलाही जीवे मारू. अशी धमकी नेतरामला त्याच्या इतर मित्रांनी दिल्याची माहिती आपल्याला गावकऱ्यांसमोर स्वतः नेतरामनी दिल्याचा,दावा सुभाष डोंगरवार यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.दीड महिन्याचा कालावधी लोटूनही आपल्या मुलाच्या खुनाचा तपास पोलिस करीत नाही. साधी चौकशी सुद्धा पोलीस विभागाने केली नाही. असा आरोप करून आपल्या मुलाचा खून करणाऱ्या आरोपींना ताबडतोब अटक करून, चौकशी करावी. आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी सुभाष डोंगरवार यांनी केली आहे.