23.9 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home गुन्हेवार्ता गोंदियाच्या तेंदू कंत्राटदाराकडून १ कोटी १२ रुपयांची रोकड जप्त

गोंदियाच्या तेंदू कंत्राटदाराकडून १ कोटी १२ रुपयांची रोकड जप्त

0
680

गडचिरोली,दि.13:गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी पोलिसांनी (दि.११) एका तेंदू कंत्राटदाराच्या वाहनातून १ कोटी १२ लाख रुपये जप्त केले. या घटनेमुळे तेंदू कंत्राटदरांमध्ये खळबळ उडाली आहे.गुरुवारला दुपारी आरमोरी पोलीस आरमोरी-देसाईगंज मार्गावरील रेशिम विकास केंद्राजवळ नाकेबंदी करीत असताना गोंदियावरुन आरमोरीमार्गे गडचिरोलीला जाणारे झायलो कंपनीचे वाहन येताना दिसले. वाहनाची तपासणी केली असता त्यात संजयकुमार किशोर टेहर(वय ५४,रा.रेलटोली गोंदिया), स्नेहल बिपिनभाई पटेल(वय ४५) व समीर कय्युम कुरेशी दोघेही रा.रामनगर गोंदिया हे तिघे जण होते. शिवाय वाहनात रक्कमही आढळून आली. परंतु तिघांचीही हालचाल संशयास्पद वाटल्याने व रकमेबाबत त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने गस्तीवरील पोलिसांनी सहायक पोलिस निरीक्षक चव्हाण यांना पाचारण केले. त्यांनी वाहन जप्त करुन त्यातील इसमांना पोलीस ठाण्यात नेले. तेथे तहसीलदार, बँक व्यवस्थापक व इतर पंचांसमक्ष रक्कम मोजली असता ती १ कोटी १२ लाख रुपये एवढी असल्याचे समजले. ही रक्कम पोलिसांनी जप्त केली असून, चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी दिली. आठवड्यापूर्वी सिरोंचा पोलिसांनी तेलंगणातून येणारी २ कोटीहून अधिक रक्कम जप्त केली होती, हे येथे उल्लेखनीय.

ग्रामसभा या त्यांच्या अंदाजीत उत्पादनापेक्षा साधारणतः 30 ते 40 टक्के कमी संकलनाची निविदा काढतात उदाहरणार्थ ‘क्ष’ ग्रामसभेच्या क्षेत्रात 1200 प्रमाणगोणी ऊत्पादनाची निवीदा काढली असेल तर तिथे 2000 गोणी ऊत्पादन होणार हे निश्चीत अपेक्षित असते. 1200 प्रमाण गोणीच्या लिलावात प्रति गोणी दर निश्‍चिती करताना सुद्धा सर्वांचे हितसंबंध जोपासून निश्चित केली जाते. यात सर्व घटकांचा समावेश होतो. साधारणत: बिडी कारखानदार खरेदी करेल अशा दरा पेक्षा अर्ध्या दराने ही निश्चिती होत असते. ऊदाहरणार्थ ‘क्ष’ ग्रामसभेने 1200 प्रमाण गोणीसाठी किमान किंमत ही रू. 6700/- ठरवली असेल तर लिलाव प्रक्रियेत जो कंत्राटदार त्यापेक्षा जास्त दर देईल त्याला निवीदा आवंटित करून करारनामा केला जातो. तेव्हा कारखानदार 12000 ते 13000 रू प्रति गोणी दर देईल हे कंत्राटदाराला अपेक्षित असते.

तेंदूपत्ता संकलन सुरू झाले की मजूर त्यांचे तेंदू पुडे बांधून विक्रीसाठी संकलन केंद्रांवर आणतात. नियमानुसार एका पूड्यात 70 पाने बांधलेली असतात. अशा 100 पूड्यांचा दर तेंदू मजूरांसाठी ठरवला जातो. मात्र खरेदी करताना 70 पानांऐवजी 80 ते 100 पानांचे पूडे आणण्यास सांगितले जाते. आणि संकलन केंद्रावर प्रति शेकडा 10 पूडे अधिक घेतले जातात. याकडे बारकाईने पाहण्याची किंवा अभ्यासण्याची गरज आहे. 70 पानांच्या पूड्याऐवजी 80 पाने व प्रति शेकड्यावर 10 पुडे म्हणजे 10 टक्के. याचाच अर्थ गोणी 15 ते 25 टक्क्यांनी वाढते.
शेवटच्या टप्प्यात लिलावाच्या आकड्यापेक्षा 30 ते 40 टक्के अधिकच्या तेंदूची नियमबाह्य खरेदी होते. नंतर गोणी ज्याला ‘बोध’ असेही म्हणतात ते वाहतूक करण्याची प्रक्रिया सुरू होते. यात एका ट्रकमध्ये जर 300 गोणी वहन करण्याची मुळ क्षमता असेल तर त्या ट्रकमध्ये 400 ते 425 गोणी वाहून नेली जातात. अशाप्रकारे कंत्राटदार लिलावातील प्रमाण गोणींच्या दुप्पट तेंदूपत्ता वहन करतात.याचे गणित केले तर क्षुल्लक तेंदूपानांचे व्यवसायातून मालक कोट्यवधींचे धनी कसे होतात हे दिसून येताच डोळे पांढरे होण्याची पाळी येईल.