जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायतमधील २९ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर;१८ मे रोजी मतदान

0
10

गोंदिया, दि.12 : निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील सदस्यांच्या रिक्त झालेल्या जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायतीमधील २९ जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून १८ मे २०२३ रोजी मतदान होणार आहे. पोटनिवडणूका असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये ०६ एप्रिल २०२३ पासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू झाली आहे.

        राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे आदेशानुसार निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील सदस्यांच्या रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणूकांसाठी पारंपारीक पध्दतीने राबविण्यात यावयाचा निवडणूक कार्यक्रम ०६ एप्रिल २०२३ रोजी जाहीर झाला आहे. त्यानुसार गोंदिया जिल्हयातील २६ ग्रामपंचायतीमधील २९ सदस्यांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणूकांसाठी निवडणूक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

        १८ एप्रिल २०२३ रोजी तहसीलदार निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करतील. नामनिर्देशपत्रे मागविण्याचा व सादर करण्याची तारीख व वेळ २५ एप्रिल ते २ मे २०२३ सकाळी ११ ते दुपारी ०३ वाजेपर्यंत असणार आहे. (सुट्टीचे दिवस वगळून). ३ मे नामनिर्देशपत्रे छाननीची तारीख असेल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची तारीख ०८ मे असेल. निवडणूक चिन्ह वाटप व उमेदवारांची यादी ०८ मे रोजी दुपारी ०३ नंतर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. १८ मे रोजी मतदानाचा दिवस असेल. मतदानाची वेळ सकाळी ०७.३० ते सायंकाळी ०५.३० अशी असेल. नक्षलग्रस्त भागात मतदानाची वेळ सकाळी ०७.३० ते दुपारी ०३ वाजेपर्यंत राहील. १९ मे २०२३ रोजी मतमोजणी व निकाल घोषित करण्यात येणार आहे. निवडणूक आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना उपजिल्हाधिकारी (सामान्य) स्मिता बेलपत्रे यांनी केल्या आहेत.