मृत व्यक्तीच्या नावावर मतदान

0
10

गोंदिया-ो खरेदीविक्री समितीची निवडणूक; चाैकशीची मागणी
रावणवाडी, ता. १२ ः गोंदिया शेतकी सहकारी खरेदीविक्री समितीच्या निवडणुकीत चक्क मृत व्यक्तीच्या नावाने दुसऱ्याच व्यक्तीने मतदान केल्याचे उघडकीस आले आहे. असे एक नव्हे, तर अनेक बोगस मतदान झाले असावे, असा अंदाज असून, या प्रकरणाची चाैकशी करावी, अशी मागणी चारगाव येथील भाऊराव हरिणखेडे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पत्रातून केली आहे.
गोंदिया शेतकी सहकारी खरेदीविक्री समितीची निवडणूक मंगळवारी (ता. ११) गोंदिया येथील मनोहर म्युनिसिपल स्कूल येथे घेण्यात आली. पाच बूथवरून मतदान झाले. या निवडणुकीत गोंदिया तालुक्यातील १०५० मतदार आहेत. परंतु, विभागाच्या ढिसाळ आणि कामचुकार प्रणालीमुळे बोगस मतदान झाले आहे. चारगाव निवासी इसना लटारू हरिणखेडे यांचे पाच महिन्यांपूर्वीच निधन झाले. मात्र, मतदारयादीत त्यांचे नाव होते. त्यांच्या नावावर अन्य दुसऱ्या व्यक्तीने बूथ क्रमांक चारवर मतदान केले. १०५० मतदारांपैकी ९०१ मतदारांनी मतदान केले. तथापि, या निवडणुकीत अनेक बोगस मतदान झाले असावे, असा अंदाज असून, या प्रकरणाची चाैकशी करावी, अशी मागणी चारगाव येथील भाऊराव हरिणखेडे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पत्रातून केली आहे.

मृत व्यक्तीच्या नावाने दुसऱ्या व्यक्तीने मतदान केल्याची तक्रार मला प्राप्त झाली आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले जाईल. त्यांच्या आदेशानुसार, पुढील कारवाई केली जाईल.

श्री. सोनारकर, सहायक उपनिबंधक, गोंदिया.
…………………………………………