प्रशांत डवरे :इंग्रजीसाठी विद्यार्थ्यांना बोलके बनविण्यावर भर द्या

0
8

सालेकसा दि.25: खर्‍या अर्थाने इंग्रजी विषयावर प्रभुत्व ठेवण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बोलके बनविण्यावर भर दिला पाहिजे, असे आवाहन जिल्हा शिक्षक प्रशिक्षण संस्था (डायट) चे प्राचार्य प्रशांत डवरे यांनी केले. ते सालेकसा-आमगाव तालुक्यातील इंग्रजी विषयाच्या पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात इंग्रजी शिक्षकांना उद्देशून बोलत होते.
जिल्हा परिषद हायस्कूलच्या परिसरात झालेल्या या पाच दिवसीय इंग्रजी विषयाच्या प्रशिक्षणाचा आढावा घेण्यासाठी त्यांनी ज्येष्ठ व्याख्याता राजेश रुद्रकार यांच्यासह भेट दिली होती. पुढे बोलताना त्यांनी, मागील तीन वर्षापासून माध्यमिक शिक्षकांना इंग्रजी विषय शिकविण्याचे नवीन तंत्र वापराबद्दल प्रशिक्षण देण्यात येत आहे. परंतु मुळात विद्यार्थ्यामध्ये फारच बदल झालेला दिसून येत नाही.
शिक्षक प्रशिक्षण घेतात परंतु त्या प्रशिक्षणाची अंमलबजावणी विद्यार्थ्यांवर न करता आपल्या पर्यंतच अडकवून ठेवतात. हे मोठे दुदैव आहे. शिक्षकांनी शिकवताना प्रामाणिकपणा दाखवून इंग्रजी विषयाबद्दल विद्यार्थी बोलके कसे होतील यावर भर द्यावे. शिक्षकांनी मनावर घेतले तर विविध साधनांचा अभाव असताना सुद्धा उत्तमरित्या अध्यापन करु शकते. यासाठी जिद्द व चिकाटी असणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.