गोरेगाव-तिरोड्याची पोलीस पाटील पदभरती रद्द करा

0
23

गोंदिया दि.25: तिरोडा व गोरेगाव तालुक्यातील पोलीस पाटील पदभरतीत मोठाच घोळ झाल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. तसेच सदर पदभरती त्वरित रद्द करून पुन्हा नव्याने पदभरती घेण्यात यावी, या मागणीसाठी अन्यायग्रस्त उमेदवारांनी बुधवार (दि.२३) सकाळी ११ वाजतापासून उपविभागीय कार्यालय तिरोडासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.आरक्षणही अवैधपध्दतीने बदलवून पात्र समाजाला डावलण्यात आल्याचाही प्रकार या भरतीत घडला.परंतु जिल्हाधिकारी,विभागीय आयुक्तांनीही याकडे कानाडोळा केला.
तिरोडा उपविभागीय कार्यालयाच्या वतीने पोलीस पाटील पदभरतीसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. मात्र निकाल विलंबाने लावण्यात आला. त्यात उमेदवारांचे गुणसुद्धा दर्शविण्यात आले नव्हते. मुलाखतही नाममात्रच झाली. या पदभरती प्रकरणाला भ्रष्टाचाराचे गालबोट लागल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. तशा मागणीच्या प्रतिलिपीसुद्धा वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आल्या आहेत.
सदर पदभरती प्रक्रियेमध्ये फार मोठा घोळ झाला आहे. त्यामुळे कुणालाही नियुक्ती आदेश देण्यात येवू नये व संपूर्ण भरती तत्काळ रद्द करून नव्याने भरती घेण्याची मागणी अन्यायग्रस्त अर्जदारांनी केलेली आहे. यात सपना सुरेंद्र तुरकर, संदीप भगत, मुकेश मिश्रा, हितेंद्र जांभूळकर, मिनाक्षी जांभूळकर, प्रशांत रामटेके, हितेंद्र येडे, मुकेश कनोजे, तारेंद्र भगत, ईश्‍वरदयाल ठाकरे, शैलेंद्र उके, प्रदीप शहारे, विनोद बावणथडे, आशीष मलेवार, महेश कुकडे, कुवर चौधरी, प्रफुल्ल चौधरी आदींचा समावेश आहे.