मुंबई विद्यापीठात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आणि साहचर्य केंद्रांची स्थापना

0
9

जागतिक दर्जाच्या विद्यापीठांशी सहकार्य करण्याची संधी होणार उपलब्ध

मुंबई, दि.01: मुंबई विद्यापीठाच्या सर्व भागधारकांना जागतिक दर्जाच्या विद्यापीठांशी सहकार्य करण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देश्याने व जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय संस्थासोबत सामंजस्य आणि भागीदारीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देश्याने मुंबई विद्यापीठात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आणि साहचर्य केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्राच्या स्थापनेमुळे प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठे आणि संस्थांसह आंतरराष्ट्रीय संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी ध्येय-धोरणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे अधिक सोयीचे होणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठ विभाग आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी जगभरातील विविध विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांशी संपर्क साधणे, जगातील सर्वोत्तम १०० विद्यापीठांशी सहयोग करणे, विद्यापीठात उपलब्ध अभ्यासक्रम आणि सुविधा अद्ययावत करण्यासाठीची प्रक्रिया राबविणे, परदेशी विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा, परिसंवाद, परिषदा आणि विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. त्याचबरोबर शैक्षणिक साधन संपत्तीचे आदान-प्रदान करणे, संयुक्त संशोधन आणि अभ्यासक्रम चालविण्यासाठी आणि सयुंक्त पदवी कार्यक्रम चालविण्याची प्रक्रिया विकसीत करण्यावर या केंद्राच्या माध्यमातून भर दिला जाणार आहे. विद्यापीठ विभाग, संस्था आणि महाविद्यालयांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठे किंवा संस्थांना भेटी आयोजित करणे आणि त्याअनुषंगाने सहाय्य करण्याचीही मोठी भूमिका या केंद्राच्या माध्यमातून पार पाडली जाणार आहे. परदेशी विद्यार्थी आणि स्थलांतरित भारतीय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक आणि इतर उपक्रम आयोजित करण्यासोबतच या केंद्राच्या उपक्रमांसाठी अर्थसंकल्पीय तरतुदही केली जाणार आहे.

विद्यापीठात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या या केंद्राच्या माध्यमातून परदेशी विद्यार्थ्यांची नोंदणी वाढविण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून या केंद्राच्या माध्यमातून देशांतर्गत विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय विद्यापीठे, त्यांचे शैक्षणिक कार्यक्रम, शूल्क संरचना बाबतची माहिती, परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या विविध कागदपत्रांशी संबंधित माहिती, व्हिसा, शिष्यवृत्ती आणि बँक कर्जांसबंधीत मार्गदर्शनही विद्यार्थ्यांना मिळू शकेल. त्याचबरोबर आयईएलटीएस, जीमॅट आणि स्पोकन इंग्लिश इत्यादी परीक्षांबद्दल मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठांमध्ये योग्य करिअर निवडण्यासाठी मार्गदर्शनही या केंद्राच्या माध्यमातून केले जाणार आहे. या दृष्टिकोनातून परदेशी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मुंबई विद्यापीठाने सर्व संलग्नित महाविद्यालये, मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठ विभागांमध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखांमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी यापूर्वीच एक खिडकी प्रणाली (सिंगल विंडो सिस्टिम) सुरू केली आहे.

“ मुंबई विद्यापीठात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आणि साहचर्य केंद्रामुळे विद्यार्थ्यांसाठी विविध संधीचे दालन यानिमित्ताने खूले होणार आहे. जागतिक दर्जाच्या अव्वल विद्यापीठामधील विविध संधी आणि आंतरराष्ट्रीय संस्थासोबत सामंजस्य व भागीदारीला यामुळे प्रोत्साहन मिळू शकेल. त्याचबरोर शैक्षणिक साधन संपत्तीचे आदान-प्रदान करणे, संयुक्त संशोधन आणि सयुंक्त पदवी कार्यक्रम चालविण्यासाठीची प्रक्रिया विकसीत करण्यावर या केंद्राच्या माध्यमातून भर दिला जाणार आहे.” – प्रा. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ