प्रा. बाळकृष्ण भोसले यांना इटलीतील प्रतिष्ठित विद्यापीठाकडून अभ्यागत प्राध्यापक म्हणून आमंत्रण

0
2

मुंबई, दि. २५ एप्रिल: मुंबई विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. बाळकृष्ण भोसले यांना इटलीतील प्रतिष्ठित पॉलिटेक्निक यूनिवर्सिटी ऑफ मार्शीकडून अभ्यागत प्राध्यापक म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. २० ते ३० मे २०२४ या दरम्यान पॉलिटेक्निक विद्यापीठाच्या अर्थशास्त्र आणि सामाजिक शास्त्र विभागामार्फत आयोजित केलेल्या सेमिनारमध्ये ते विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना मार्गदर्शन करतील. ‘अँडरस्टंडिंग डेवलपमेंट इन इंडिया: बैलेंसिंग एक्स्पांसन अँड सस्टेनबिलीटी’ आणि ‘ द लेबर मार्केट इन इंडिया अँड सोशिओ एनव्हायरनमेंटल सस्टेनबिलीटी’ हे त्यांच्या व्याखानाचे विषय आहेत.

मुंबई विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. बाळकृष्ण भोसले यांना अध्यापन आणि संशोधनाचा दीर्घ अनुभव आहे. सामाजिक शास्त्र अध्यापनाच्या क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ख्यातनाम नियतकालिक आणि प्रकाशनांत त्यांचे मोठे योगदान आहे. विविध विषयांवरील लेख आणि पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी समाजशास्त्रातील अनेक पैलूंवर प्रकाश टाकला आहे. प्रतिष्ठीत ऑक्सफोर्ड विद्यापीठातील सेड बिज़नेस स्कूल मधून त्यांनी अकॅडेमिक लीडरशिप डेवलपमेंट प्रोग्रामही केला आहे.

प्रा. बाळकृष्ण भोसले यांनी यापूर्वी अल्केश दिनेश मोदी वित्तीय व व्यवस्थापन संस्थेचे प्रभारी संचालक, राजीव गांधी समकालीन अध्ययन केंद्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध आणि सामरिक अध्ययन केंद्राचे प्रभारी संचालक म्हणून काम पाहिले आहे. प्रा. बाळकृष्ण भोसले यांना अभ्यागत प्राध्यापक म्हणून मिळालेल्या आमंत्रणाबद्दल मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी प्रा. बाळकृष्ण भोसले यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.