जगावर छाप टाकण्यासाठी युवकांनी सक्षम व्हावे- खा. पटोले.

0
12

रासयोच्या शिबिरार्थी सोबत खा. पटोले यांनी केली ग्रामसफाई
अर्जूनीमोर, दि. ११- सामाजिक कार्याचा वसा हा कॉलेज जीवनातूनच मिळतो. युवाशक्तीमुळेच देशाचे भवितव्य उज्ज्वल होऊ शकतो. युवकांनी देशाप्रती सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे. ग्रामगीता व संविधान हे आपला आत्मा आहेत. मात्र, आम्हाला हे समजलं नसल्याने देशात गरिबी व बेरोजगारी वाढलेली आहे. या गोष्टींचे समूळ उच्चाटन करायचे काम आता युवकांच्या खांद्यावर आहे. जपानमध्ये लोकांनी देशासाठी काम केल्याने हा छोटासा देश प्रगत व शक्तिशाली बनला. भारतीय युवकांनीही देशासाठी कार्य करून जगावर छाप टाकण्यासाठी युवा पिढीने सक्षम बनले पाहिजे, असे प्रतिपादन गोंदिया-भंडारा क्षेत्राचे खासदार नाना पटोले यांनी केले.
अर्जुनीमोर येथील एस. एस.जे. महाविद्यालयात आयोजित नागपूर विद्यापीठ स्तरीय रासयो शिबिरात ते (ता. ११) बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी जि.प.अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे, जि.प. सदस्य कमल पाऊळझगडे,सरपंच राधेश्याम झोडे, प्रा. डॉ. संजीव पाटणकर, कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेश चांडक आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि वैराग्यमूर्ती गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून श्रमदान व संवाद कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. दरम्यान, शिबिरार्थी सोबत खासदार पटोले यांनी सुद्धा ग्रामसफाईत सहभाग घेतला.
प्रास्ताविक प्रा. शरद मेश्राम यांनी केले. संचालन प्रा. डॉ. दिलीप काकडे यांनी केले. उपस्थितांचे आभार डॉ. राजेश चांडक यांनी मानले. यावेळी प्राध्यापक वर्ग विद्यार्थी पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.