अतिवृष्टीमुळे MHT-CET परीक्षेला वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना पुनश्च संधी द्या– आ.विजय रहांगडाले

0
25

तिरोडा, दि.11 : बुधवार, 10 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीपासून अतिवृष्टीमुळे गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील रस्ते बंद झाले होते. महाराष्ट्र राज्यस्तरीय सामान्य प्रवेश परीक्षा (MHT-CET) 2022 मध्ये अतिवृष्टीमुळे गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थी नागपूर येथे परीक्षा केंद्रावर पोहोचू शकले नाही. अशा विद्यार्थ्यांना पुनश्च संधी देण्याबाबत तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना विनंती केलेली आहे.

सविस्तर असे की, 10 ऑगस्ट 2022 रोजी गोंदिया व भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणात नदी-नाल्यांना पूर आले. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटून दळणवळणाची रस्ते बंद झालेली आहेत. त्यातच 10 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्र शासनातर्फे पदवीपूर्व अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशकरिता राज्यस्तरीय सामान्य प्रवेश परीक्षा (MHT-CET) आयोजित करण्यात आलेली होती. नागपूर व इतर दूर ठिकाणी परीक्षा केंद्र असलेले विद्यार्थी पूरपरिस्थितीमुळे परीक्षा केंद्रापर्यंत पोहचू शकले नाही. त्यामुळे सन 2022 च्या एमएचटी-सीईटी परीक्षेपसून वंचित राहिलेले आहेत. परिणामी या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेशापासून ते वंचित राहणार आहेत.

विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता 10 ऑगस्ट 2022 रोजी अतिवृष्टी व पुरामुळे एमएचटी-सीईटी परीक्षेमध्ये वंचित राहिलेल्या गोंदिया व भंडार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना पुनश्च परीक्षेमध्ये बसण्याची संधी देण्यात यावी. असे विनंतीपूर्ण निवेदन आ. विजय रहांगडाले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे.

आ.विजय रहांगडाले यांचे पत्र MHT-CET