विद्यानगरी परिसरात विविध उपक्रमांना सुरुवात-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उदघाटन

0
9
  • ग्रीन कॅम्पस अंतर्गत सायकल शेअरींग योजना
  • स्मार्ट कंपोस्ट सिस्टीम अँड ऑर्गेनिक फार्मिंग
  • सुशोभित तलाव
  • मुंबई विद्यापीठ अँक्सलरेटर सेंटर

मुंबई,दि. ०८ सप्टेंबर: मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी संकुलात आज विविध चार उपक्रमांना सुरुवात करण्यात आली आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये हरित कॅम्पस अंतर्गत सायकल शेअरींग योजना, स्मार्ट कंपोस्ट सिस्टीम अँड ऑर्गेनिक फार्मिंग व पोर्टेबल बायो कंपोस्ट सिस्टीम,  सुशोभित तलाव आणि  मुंबई विद्यापीठ अँक्सलरेटर सेंटर या उपक्रमांचा समावेश आहे. विद्यानगरी संकुलात आयोजित करण्यात आलेल्या या उद्घाटन सोहळ्यास मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र.कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्रभारी कुलसचिव प्रा. शैलेंद्र देवळाणकर, विशेष कार्य अधिकारी डॉ. सुभाष दळवी, डॉ. श्रद्धा दळवी, घनकचरा व्यवस्थापन सल्लागार अश्विनी बोरूडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

ग्रीन कॅम्पस अंतर्गत सायकल शेअरींग योजना

हरित कॅम्पस अंतर्गत सायकल शेअरींग योजनेअंतर्गत विद्यानगरी परिसरात येणाऱ्या विद्यार्थी, पालक आणि भेट देणाऱ्या व्यक्तिंना विद्यानगरी परिसरात कुर्ला आणि सांताकृझ या दोन महत्वाच्या स्थानकाव्यतिरिक्त जवळच्या मेट्रो स्थानकातून येण्याकरीता व फिरण्यारीता सायकल शेअरींग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत संबंधितांना कमी खर्चात सदरची योजना मोबाईल अँपद्वारे वापरता येणार आहे. हरित संकुल योजनेअंतर्गत विद्यापीठाने या पर्यावरणपुरक उपक्रमाला सुरुवात केली आहे.  माय बाईक यांच्या सहकार्याने ही योजना राबविण्यात येत आहे.

स्मार्ट कंपोस्ट सिस्टीम

स्मार्ट गांडूळ खत सिस्टीम व सेंद्रीय शेती या उपक्रमाअंतर्गत विद्यापीठातील ओला व सुख्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे.  स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कचरा प्रक्रीया केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. बृह्ननमुंबई महानगर पालिकेचे स्वच्छ भारत अभियान मुंबईचे विशेष कार्य अधिकारी डॉ. सुभाष यशवंत दळवी यांच्या संकल्पनेतून ही योजना राबविण्यात आली आहे. सदर प्रकल्पास श्री आस्था महिला बचत गट व इसीजीसी लिमिटेड यांचे सहकार्य लाभले आहे. सदर प्रक्रीयेमध्ये ओल्या कचऱ्यावर एरोबिक पद्धतीने गांडूळाच्या सहाय्याने तसेच स्मार्ट बायो कंपोस्टींग सिस्टिमच्या माध्यमातून बायोकल्चर च्या सहाय्याने अन्न पदार्थांच्या समिश्र कचऱ्यावर प्रक्रियेनंतर खतनिर्मिती होणार आहे. हे खत प्रकल्प परिसरातील उद्यानांचे संवर्धन, फळबाग निर्मिती व सेंद्रीय शेतीच्या उपक्रमासाठी तसेच स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान कार्यक्रमाअंतर्गत वापरला जाणार आहे.

 सुशोभित तलाव

विद्यानगरी परिसरातील नैसर्गिक जुन्या तलावाचे सुशोभीकरण करून आजुबाजूचा परिसरही सुंदर व देखणा करण्यात आला आहे. या तलावाच्या सुशोभिकरणासोबतच फुलपाखरू उद्यान व फॉरेस्ट उद्यान देखील तयार करण्यात आले आहे. सदर तलावातील पाणी शुद्धीकरण करण्याचीही योजना नियोजित करण्यात आली आहे.  सोबतच विद्यार्थ्यांच्या कलेला वाव देण्याच्या अनुषंगाने तलावाच्या शेजारी अँपी थिएटरची निर्मिती देखील करण्यात आली.

मुंबई विद्यापीठ अँक्सलरेटर सेंटर

अँक्सलरेटर मास स्पेक्ट्रोमेटरी हे विज्ञानामधील नवीन आणि अद्ययावत तंत्रज्ञान असून याचा उपयोग भूविज्ञान, जलविज्ञान, भूभौतिकी,वायुमंडलीय विज्ञान, समुद्र विज्ञान आणि अगदी बायोमेडिसीनमध्ये देखील याचा उपयोग करता येतो. या तंत्रज्ञानाला रेडिओ कार्बन डेटिंग सुद्धा संबोधल जाते. मुंबई विद्यापीठामध्ये ही सुविधा मुंबई विद्यापीठ आणि भारत सरकारच्या अणू विभागाने विकसीत केली आहे.