‘मोबाईल डिजीटल स्कूल’मध्ये भंडारा जिल्हा राज्यात अव्वल

0
11

भंडारा : शालेय शिक्षण क्रीडा विभाग मुंबई अंतर्गत सीएसआरद्वारे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या शासन निर्णयांतर्गत मिशन मोबाईल डिजीटल स्कूलमध्ये राज्यातून भंडारा जिल्हय़ाने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. या उपलब्धीने जिल्हय़ातील शिक्षण क्षेत्रात जिल्हा प्रशासनाने जिल्हय़ाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या आशयाची घोषणा शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी काल केली. गडचिरोली जिल्हय़ातील भामरागड तालुका प्रथम व जिल्हा म्हणून भंडारा जिल्हय़ाचा क्रमांक प्रथम आला आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग (मुंबई), महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था (डायट), शिक्षण विभाग व हेमंत सेलिब्रेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अंशत: सीएसआरद्वारे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र निर्णयांतर्गत ‘मिशन मोबाईल डिजीटल स्कूल’ कार्यशाळा ३0 मार्चला घेण्यात आली. यावेळी शिक्षण आयुक्त डॉ. भापकर यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे भंडारा जिल्हय़ाने ‘मिशन मोबाईल डिजीटल स्कूल’ अंतर्गत १00 टक्के जिल्हा प्रगत शाळेत मोबाईलचा वापर अध्ययन साहित्य म्हणून करण्यात येण्यात यशस्वी ठरल्याचे सांगून भंडारा जिल्हा राज्यातून अव्वल आल्याची घोषणा केली.
यावेळी मंचावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अभयसिंह परिहार, उपशिक्षणाधिकारी स्वर्णलता घोडेस्वार, गटशिक्षणाधिकारी एस. एच. तिडके, तत्वराज अंबादे, रमेश गाढवे, रमेश सिंगनजुडे, मुबारक सैयद, जयंत उपाध्ये, शिक्षक समितीचे पदाधिकारी व केंद्रप्रमुख उपस्थित होते. या मिशन अंतर्गत जिल्हा परिषद शाळेतील प्रत्येकी एक शिक्षकाला कार्यशाळेला पाचारण करण्यात आले होते. यात जिल्हाभरातून ७७८ शिक्षकांनी हजेरी लावली होती. देवानंद घरत व जीत बुंदेले या सुलभकांच्या मदतीने शिक्षकांना मोबाईल एक अध्ययन साहित्याचे तांत्रिक कौशल्य देण्यात आले. यावेळी शिक्षकांनी भंडारा जिल्हा १00 टक्के मोबाईल स्कूल झाले असे आवाजी पध्दतीने एक मताने सांगितले.