वृक्षलागवडीसाठी आता शाळांचाही सहभाग

0
12

जनजागृतीसाठी शाळांमार्फत विद्यार्थ्यांची रॅली

मुंबई, दि.23 : दोन कोटी झाडे लावण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती
घेण्यात आला असून शालेय शिक्षण विभागानेही या कार्यक्रमात पुढाकार घेतला
आहे. या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी शाळांमार्फत विद्यार्थ्यांची रॅली
आयोजित करण्यात येणार असून ‘पहिले पाऊल, वृक्ष लावून’ हे घोषवाक्य
वापरावे असे आवाहन शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.

येत्या 1 जुलै 2016 रोजी होणाऱ्या दोन कोटी वृक्ष लागवडीबाबतच्या
जनजागृतीसाठी शाळेत विद्यार्थ्यांची रॅली आयोजित करण्यात येत आहे. वृक्ष
लागवड कार्यक्रमाचे प्रभावीपणे ऑनलाईन सनियंत्रण होण्यासाठी अपर प्रधान
मुख्य वन संरक्षक यांच्यामार्फत आवश्यक आज्ञावली विकसित करण्यात आल्या
आहेत. 1 ते 7 जुलै, 2016 या वन महोत्सव कालावधीत तसेच दिनांक 1 जुलै 2016
या दिवशी राज्यातील शाळांच्या आवारात आणि शालेय शिक्षण विभागाच्या
क्षेत्रीय कार्यालयांच्या आवारात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.

याबाबतचे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या
संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेताक 201606181558290821 असा आहे.