शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीचे नियोजन करा- जिल्हाधिकारी प्रजित नायर

0
20
  • खरीप हंगाम आढावा सभा

          गोंदिया, दि.25 : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषि विभागाने पुढाकार घ्यावा. शेतीतून जास्तीत जास्त प्रकारची पिके कसे घेता येतील यासाठी मार्गदर्शन करुन खरीप हंगामात नियोजित लक्षांकात वाढ करुन शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीचे नियोजन करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी दिले.

         जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज खरीप हंगाम पुर्व आढावा सभा घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी हिंदुराव चव्हाण, जिल्हा अग्रणी प्रबंधक नरेंद्र मडावी, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक अविनाश लाड, जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार, आत्माचे प्रकल्प संचालक अजित आडसुळे, कृषि विकास अधिकारी महेंद्र मडामे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

         जिल्हाधिकारी श्री. नायर म्हणाले, शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था व्हावी यासाठी मागणी केलेल्या शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना तातडीने वीज जोडून देण्यात यावी. राष्ट्रीयकृत सहकारी बँकांनी शेतकरी सभासदांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे. जिल्ह्यात कुठेही खताची लिंकींग होणार नाही याची विशेष दक्षता घेण्यात यावी. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देय असलेली प्रलंबीत रक्कम सोमवार 29 एप्रिल पर्यंत देण्याचे निर्देश युनिव्हर्सल सोम्पो या पीक विमा कंपनीला दिले. कृषि विज्ञान केंद्र हिवरा येथे मत्स्यबीज निर्मिती केंद्र स्थापन करण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने तीन दिवसात परिपूर्ण अहवाल सादर करावा. फळबाग लागवडीचे लक्षांक वाढविण्यात यावे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतीमध्ये विविध प्रकारचे प्रयोग करुन अधिक उत्पन्न घेण्यासाठी कृषि विभागाने मार्गदर्शन करुन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.

        सन 2023-24 या वर्षात खरीप हंगामात केलेल्या कामाची माहिती देऊन खरीप हंगाम सन 2024-25 या वर्षाचे नियोजन सादर केले. सन 2023-24 या वर्षात सरासरी 1310.18 मि.मी. पाऊस झाला. याच वर्षात 4 लाख 89 हजार 543 मेट्रीक टन उत्पादन झाले होते. यात भात पिकाचे उत्पादन 4 लाख 71 हजार 147 मेट्रीक टन आहे तर उर्वरित पिकांमध्ये तुर, तीळ व भाजीपाल्याचा समावेश आहे. सन 2024-25 साठी 5 लाख 59 हजार 925 मेट्रीक टन उत्पादनाचे लक्ष ठेवण्यात आले आहे. यात भात पीक उत्पादनासाठी 5 लाख 21 हजार 640 मेट्रीक टन उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. उर्वरित पिकांमध्ये तुर, तीळ व भाजीपाला पिकाचा समावेश आहे. अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी सादरीकरणाद्वारे दिली. सभेला विविध विभागाचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते.