दवनीवाडा जि.प.शाळा :गावकर्‍यांनी ठोकले शाळेला कुलूप

0
12

दवनीवाडा,दि.08 :गोंदिया तालुक्यातील सर्वात मोठे गाव तालुकास्थळाची मागणी करणारे गाव परंतु येथील शाळेत शिक्षकांची मागणी करून शिक्षक दिले जात नसल्याने अखेर संतप्त गावकर्‍यांनी येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाला गुरूवारी (दि.५) कुलूप ठोकले. विशेष म्हणजे प्रकरणावर तोडगा निघाला नसल्याने हे आंदोलन भडकण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
गोंदिया जिल्हा परिषद शिक्षण विभागांतर्गत येत असलेले दवनीवाडा येथील जि.प. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय ब्रिटीश कालीन आहे. शाळेने चांगले नाव लौकीक केले आहे. पण जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष व पदाधिकार्‍यांच्या राजकारणने या शाळेची दुर्दशा व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या शाळेत वर्ग ५ते १२ वीपर्यंत कला व विज्ञान शाखेत विद्यार्थी शिक्षण घेतात. पण शाळेत पाच-सहा वर्षापासून शिक्षकांची कमतरता आहे. यासाठी शाळा समिती व गावकरी शिक्षकांची मागणी करीत दरवर्षी निवेदन देतात. मात्र एकही शिक्षक दिले जात नाही. यामुळे मुले-मुली खासगी शाळेत धाव घेत आहेत.
जिल्हा परिषदेचे याकडे सपशेल दुर्लक्ष असल्याने गावकर्‍यांनी गुरूवारी (दि.७) शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता व त्यानुसार शाळेला कुलूप ठोकण्यात आले. गावकर्‍यांनी एकही शिक्षकाला आत जाऊ दिले नाही. तर विद्यार्थीही बाहेर ठाम राहिले. प्रकरणी मुख्याध्यापकाने गटशिक्षणाधिकार्‍यांना फोनद्वारे सांगितले. यावर दुपारी ३ वाजता गटशिक्षणाधीकारी डोये आले व त्यांनी दोन शिक्षकांना तिरोडा वरुन फोनवरुन बोलावले. तात्पुरती व्यवस्था म्हणून त्यांना बोलाविल्याचे डोये यांनी सांगीतले.मार्ग निघाला नसून तिव्र आंदोलनाचा इशारा पंचायत समिती सदस्य गुड्ड लिल्हारे, सरपंच तिजा मस्करे, नीरज सोनेवाने, राजेश उरकुडे, लांजेवार, धपाडे, नागपुरे व पालकवर्गाने दिला आहे.