दारुच्या नशेत तर्र शिक्षकाची सीईओंनी केली पोलिस ठाण्यात रवानगी

0
11

गडचिरोली, दि. ११-जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आकस्मिक भेटीदरम्यान एक शिक्षकच दारुच्या नशेत तर्र असल्याचे आढळून आल्याने सीईओंनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना गरगडा येथे घडली. या घटनेमुळे मद्यपी व कामचुकार शिक्षकांमध्ये धडकी भरली आहे.
त्याचे झाले असे की, अलिकडेच मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी ‘ड’ वर्गातील शाळांची माहिती या शाळांना आपण भेट देणार असल्याचे गटशिक्षणाधिकाऱ्यांना सांगितले होते. त्यानुसार मुख्य कार्यपालन अधिकारी शंतनू गोयल काल(दि..१०) कुरखेडा तालुक्यातील ‘ड’ वर्गातील पाच शाळांना आकस्मिक भेट देण्यासाठी पोहचले. बोरटोला, येडापूर या शाळांना भेट देत श्री. गोयल यांनी गडगडा येथील जिल्हा परिषद शाळेत पाय ठेवला. बघतात तर काय? तेथील शिक्षक फाल्गुन गिरडकर हे मद्यधुंद अवस्थेत टेबलावर पाय ठेवून असल्याचे दिसून आले. श्री.गोयल यांनी दोन-तीनदा आवाज देऊन गिरडकर गुरुजींना उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु ‘साहेब’ काही जागे झाले नाही. त्यामुळे श्री.गोयल संतापले आणि त्यांनी गिरडकरला स्वत:ला गाडीत टाकून कुरखेडा पोलिस ठाणे गाठले. तेथे पोलिसांनी हिसका दाखविताच गुरुजींचे डोळे उघडले. पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली. मात्र गडगडा हे गाव पुराडा पोलिस ठाण्यांतर्गत असल्याने त्याला पुराडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.