२0 टक्के अनुदानाच्या जीआरची होळी

0
11

नागपूर : गेल्या १५ वर्षापासून विना वेतन काम करणार्‍या कायम विना अनुदानित शाळांमधील शिक्षकांना अनुदानाचे गाजर दाखविणार्‍या राज्य शासनाच्या अन्यायकारक जीआरची राष्ट्रवादी शिक्षक संघातर्फे शिक्षण उपसंचालक कार्यालयापुढे होळी करण्यात आली. शासनाने १९ सप्टेंबर २0१६ रोजी काढलेल्या शाळा अनुदानाच्या शासन निर्णयात अन्यायकारक अटी लादल्या असून, शिक्षकांना व विद्यार्थ्यांना सुद्धा बायोमेट्रिक प्रणाली अनिवार्य केली आहे. त्याचबरोबर ९ व १0 वर्गाचा १00 टक्के निकाल असणे आवश्यक आहे. या अटी पूर्ण केल्यावरही २0 टक्केच अनुदान देणार असल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
शासनाने कायम विना अनुदानित शाळांना १00 टक्के अनुदान द्यावे, अनुदानाच्या सूत्रात बदल करू नये, अशी मागणी शिक्षकांची आहे. शुक्रवारी शासनाच्या या निर्णयाची होळी करून निषेध करण्यात आला. यावेळी विभागीय अध्यक्ष खेमराज कोंडे, ओमप्रकाश धाबेकर, देवेंद्र सोनटक्के, मोहम्मद आबिद शेख, सतीश अवसरे, कपिल उमाळे, नरेश भोयर, सुरेश कामनापुरे, नीलेश ढोरे, प्रदीप जांगडे, माला गोडघाटे, राजाभाऊ टाकसळे, विलास कोडापे, रमेश भोयर आदी उपस्थित होते.