25.7 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home शैक्षणिक रॅगिंग भोवली, यवतमाळा येथे आयुर्वेदच्या १८ विद्यार्थ्यांवर कारवाई

रॅगिंग भोवली, यवतमाळा येथे आयुर्वेदच्या १८ विद्यार्थ्यांवर कारवाई

0
68

यवतमाळ : आयुर्वेद प्रथम वर्षात नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची रॅगिंग घेतल्याप्रकरणी येथील डायाभाई मावजी मजिठिया आयुर्वेद महाविद्यालयातील १८ विद्यार्थ्यांवर कारवाई निश्चित करण्यात आली आहे. एका विद्यार्थ्याला एक वर्षाकरिता महाविद्यालयातून रस्टिकेट केले जाणार आहे. शिवीगाळ करणे, कामे करून घेणे, लिहून मागणे, रूमवर बोलविणे, वेगवेगळ्या मैदानावर खेळायला येण्यास सांगणे आदी प्रकारे रॅगिंग केली जात होती.
वरिष्ठ विद्यार्थ्यांनी रॅगिंग घेतल्याची तक्रार बीएएमएस प्रथम वर्षातील नवीन विद्यार्थ्यांनी यूजीसी अॅन्टी रॅगिंग हेल्पलाइन न्यू दिल्ली या वेबसाइटवर केली होती. २१ विद्यार्थ्यांनी रॅगिंग घेतल्याचे त्यांनी या तक्रारीत नमूद केले होते. या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना यूजीसी अॅन्टी रॅगिंग हेल्पलाइन न्यू दिल्ली आणि अवधूतवाडी पोलिस ठाण्याच्या वतीने महाविद्यालयाला देण्यात आल्या होत्या. यानुसार शनिवारी महाविद्यालयात अॅन्टी रॅगिंग कमिटीची बैठक घेण्यात आली. यामध्ये महाविद्यालयाच्या अॅन्टी रॅगिंग कमिटीमधील यवतमाळचे तहसीलदार योगेश देशमुख, अवधूतवाडी पोलिस ठाण्याचे ठाणेदार नंदकिशोर काळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजीव मुंदाने यांच्यासह पालक प्रतिनिधी, सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. यूजीसीकडे झालेल्या तक्रारीत नमूद केलेल्या विद्यार्थ्यांनी रॅगिंग घेतल्याचे यावेळी स्पष्ट झाल्याने समितीने त्यांच्यावर कारवाई निश्चित केली. यामध्ये आठ विद्यार्थ्यांना सहा महिन्यांकरिता महाविद्यालयातून रस्टिकेट केले जाईल. चार विद्यार्थ्यांना पाच हजार रुपये, एका विद्यार्थ्याला चार हजार रुपये दंड, तीन विद्यार्थ्यांना तीन हजार, तर एका विद्यार्थ्याला दोन हजार रुपये दंड ठोठावण्याचे प्रस्तावित आहे.