सर्वंकष आराखड्यातून विद्यापीठाच्या विकासाला गती

0
7

गडचिरोली दि.१९ :: गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापीठातून नवीन ज्ञानप्राप्ती होण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. याकरिता सर्वंकष आराखडा आवश्यक आहे. राज्य शासनाने आपल्यावर टाकलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून गोंडवाना विद्यापीठाच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासनाकडे सर्वंकष आराखडा सादर करणार, या आराखड्यातून गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात शैक्षणिक क्रांती घडेल, असा आशावाद आॅबझर्व्हर रिसर्च फाऊंडेशन मुंबईचे चेअरमन सुधिंद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

‘गोंडवाना विद्यापीठाची भविष्याची दिशा, आराखडा व रूपरेषा संदर्भात शैक्षणिक समुदायास आवाहन’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात प्रमुख मार्गर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर होते. प्रमुख अतिथी म्हणून गिरीश प्रभूणे, प्रा. राजेश राकडे, विद्यापीठाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीराम रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना सुधिंद्र कुलकर्णी म्हणाले, गोंडवाना विद्यापीठाचा विकास आराखडा बनवून तो राज्यपाल व महाराष्ट्र शासनाला सादर करण्याचे काम आॅबझर्व्हर रिसर्च फाऊंडेशनला मिळाले आहे. फाऊंडेशनने आतापर्यंत प्राथमिक, माध्यमिकपासून उच्च शिक्षणापर्यंत रिसर्च करून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी व विकासासाठी विशिष्ट आराखडा शासनाला सादर केला आहे. या आराखड्याच्या माध्यमातून आजवर अनेक विद्यापीठांच्या शैक्षणिक कार्याला गती आली. आयटीआयबाबतही सर्वेक्षण करण्यात आले असून यासंदर्भातील अहवाल केंद्र व राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या माध्यमातून नवीन ज्ञानाची निर्मिती झाली पाहिजे, इच्छाशक्ती व दृष्टी ठेवली तर गडचिरोलीचे गोंडवाना विद्यापीठ जगातील श्रेष्ठ विद्यापीठाच्या यादीत नक्कीच समाविष्ट होईल, असे ते म्हणाले.