अमरावती विद्यापीठाचा तेहतिसावा दीक्षान्त समारंभ गुरुवारी

0
10

अमरावती दि.22- – संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा तेहतिसावा दीक्षान्त समारंभ गुरुवारी (ता. 23) सकाळी 11 वाजता होत आहे. यंदाच्या या दीक्षान्त समारंभाला दोन कुलपतींची उपस्थिती म्हणजे विद्यापीठाच्या इतिहासात महत्त्वपूर्ण घटना म्हणून नोंद होईल. समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे राज्यपाल तथा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलपती विद्यासागर राव; तर प्रमुख पाहुणे बिहार राज्यातील राजगीर येथील नालंदा विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ. विजय भटकर उपस्थित राहून दीक्षान्त भाषण करणार असल्याचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर म्हणाले. पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांची नुकतीच नालंदा विद्यापीठाच्या कुलपतिपदी शासनाने नियुक्‍ती केली, याबाबत कुलगुरू डॉ. चांदेकर यांनी विद्यापीठातर्फे त्यांचे अभिनंदन केले. डॉ. भटकर यांना महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्रभूषण; तर केंद्र शासनाने पद्मभूषण देऊन सन्मानित केले. 34 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच विद्यापीठात दोन कुलपतींची उपस्थिती ही या समारंभाचे आकर्षण राहणार आहे.