आमदार काशिवारांचा ‘ई-लर्निंग’साठी ७६ लाख रूपयांचा निधी

0
13

भंडारा-दि.०5:क्षेत्राच्या विकासासाठी स्थानिक विकास निधीतून कामे प्रत्येकच लोकप्रतिनिधी करीत असतात. परंतु त्यापलिकडे जाऊन साकोलीचे आमदार बाळा काशिवार यांनी जिल्हा परिषद शाळांचा चेहरा बदलविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या पुढाकारामुळे साकोली क्षेत्रातील ९१ शाळांमधील विद्यार्थ्यांना ‘ई-लर्निंग’चे शिक्षण मिळणार आहे.आ.बाळा काशिवार यांनी त्यांच्या आमदार निधीतून या शाळा डिजीटल केलेल्या आहेत. यासाठी त्यांनी ७५ लाख ९२ हजार ९९९ रूपये जिल्हा परिषद शिक्षण विभागाला दिले. यातून ७९ शाळा डिजीटल झालेल्या असून उर्वरित १५ शाळा होणार आहेत. आमदार बाळा काशिवार यांनी जिल्हा परिषद शाळांसाठी निधी देऊन विद्यार्थ्यांना ई-लर्निंगचे शिक्षण देण्यासाठी चालविलेले प्रयत्न वाखाण्यासारखे आहे. आ.काशिवार यांनी त्यांच्या क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवीच्या जिल्हा परिषद शाळांवर सन २०१४-१५, २०१५-१६ आणि २०१६-१७ या तीन वर्षात हा निधी खर्च केला असून यातून आता विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षण मिळत आहे.
आ.काशिवार यांनी २०१४-१५ मध्ये पहिल्या टप्प्यात २० लाखांचा निधी दिला. यात २२ शाळा डिजीटल करण्यात आल्या. १५-१६ मध्ये दुसऱ्या टप्प्यात १२ लाख ९३ हजारांचा निधी दिला. यात १३ शाळा डिजीटल केल्यात. २०१६-१७ मध्ये तिसऱ्या टप्प्यात ४२ लाख ९९ हजार ९९९ रूपयांचा निधी दिला. यात ४६ शाळा डिजीटल करण्यात आल्या. यातील ११ लाख ४३ हजारांचा निधी शिल्लक असून १५ शाळा डिजीटल करण्यात येणार आहे.
आ.काशिवार यांनी जिल्हा परिषद शाळा डिजीटल करण्यासाठी लाखांदूर तालुक्यातील ८५ शाळांपैकी ३० शाळा, लाखनी तालुक्यात ८९ शाळांपैकी १९ शाळा तर साकोली तालुक्यात ९६ शाळांपैकी ३० शाळांमध्ये डिजीटल प्रोजेक्टर लावण्यासाठी निधी दिला आहे. साकोली विधानसभा क्षेत्रातील लाखांदूर, लाखनी व साकोली येथील १७९ जिल्हा परिषद शाळांपैकी तब्बल ७९ शाळांमध्ये डिजीटल क्लॉसरूम तयार करण्यात आले आहे. यातून विद्यार्थ्यांना ई-लर्निंगचा पाठ्यक्रम शिकविण्यात येत आहे. उर्वरित १५ शाळांच्या यादीला अंतिम स्वरूप मिळाले असून येत्या काही दिवसात या शाळांमध्ये ई-लर्निंग शिक्षण मिळणार आहे.