विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे पैसे थेट बॅंकखात्यात

0
13

गोंदिया,दि.२०(berartimes.com) – सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून पहिली ते आठवीच्या पात्र विद्यार्थ्यांना गणवेश दिले जातात. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे पैसे थेट त्यांच्या बॅंकखात्यात जमा करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. विद्यार्थ्याचे व त्याच्या आईचे संयुक्त खाते बॅंकेमध्ये काढण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील सर्व मुली, अनुसूचित जाती-जमातीची मुले, दारिद्रयरेषेखालील सर्व संवर्गातील पालकांची मुले यांना या योजनेचा लाभ दिला जातो. राज्यातील 37 लाख 62 हजार 27 मुलांना प्रत्येकी दोन गणवेश दिले जातील. यासाठी केंद्र सरकारने 150 कोटी 48 लाख 10 हजार 800 रुपयांची तरतूद केली आहे.
पाच डिसेंबरला शासनाने लाभाच्या वस्तूंची रक्कम थेट खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून पुस्तके व गणवेश दिला जातो. यंदाच्या वर्षी पुस्तकांचे पैसे खात्यावर देणे शक्‍य नसल्यामुळे पूर्वीप्रमाणेच मोफत पुस्तके दिली जातील; मात्र गणवेशाचे पैसे विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यावर जमा होणार आहेत. मोफत गणवेशाची कार्यवाही करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांनी पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांची बैठक घ्यावी. त्यामध्ये मुलाचे व त्याच्या आईचे संयुक्त खाते राष्ट्रीयीकृत बॅंकेमध्ये उघडून घेण्यासंदर्भात माहिती द्यावी. आई हयात नसल्यास इतर पालकांसोबत संयुक्त खाते काढावे. या योजनेमध्ये विद्यार्थ्याचे आधार कार्ड महत्त्वाचे आहे.
गणवेशाचा रंग ठरविण्याचा अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला आहे. गणवेश खरेदीचा निधी राज्याकडून जिल्हा स्तरावर आल्यास तो थेट संबंधित शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर जमा करावा. पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांनी स्वतः दोन गणवेश खरेदी करावेत. त्याच्या पावत्या मुख्याध्यापकांना द्याव्यात. मुख्याध्यापकांनी पालकांकडून सर्व पावत्या 30 जूनपर्यंत संकलित करून प्रती गणवेश 200 प्रमाणे पैसे खात्यावर वर्ग करावेत. पहिलीच्या वर्गात प्रवेश करणारे विद्यार्थी माहिती असल्यास त्यांच्या पालकांना खाते उघडण्यास सांगून एक महिन्याच्या आत पैसे जमा करावेत, असे सांगण्यात आले आहे.