अभियांत्रिकी प्रवेश ५ जूनपासून

0
7
नागपूर दि.30 :  प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या येत्या शैक्षणिक वर्षासाठीच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना ५ ते १७ जून या कालावधीत प्रवेश अर्ज भरता येणार आहे. तर, १ ऑगस्ट रोजी अभियांत्रिकीचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन आहे.
राज्य सामाईक प्रवेश चाचणी कक्षाने अभियांत्रिकी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. कक्षामार्फत राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील सुमारे दीड लाख जागांसाठी केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया (कॅप) राबविली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना सुरुवातीला ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. या प्रक्रियेत केंद्रीय पद्धतीने तीन फेर्‍या होणार आहे. तर, जे विद्यार्थी विविध कारणांमुळे १७ जून या मुदतीत अर्ज करू शकणार नाहीत. त्यांच्यासाठी कॅप फेर्‍या झाल्यानंतर संस्थास्तरावर स्वतंत्र फेर्‍या घेतल्या जाणार आहेत. सुमारे दोन महिने ही प्रवेश प्रक्रिया चालणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ‘एमएचटी-सीईटी-२0१७’ या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे, त्या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाच्या नोंदणीसाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. जेईई (मुख्य) परीक्षेतून पात्र ठरणार्‍या विद्यार्थ्यांना शुल्क आकारले जाणार आहे. प्रवेश प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे.
संस्थास्तरावर स्वतंत्र फेर्‍या
तीन कॅप फेर्‍यांसाठी ५ ते १७ जून या कालावधीत ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. मागील वर्षी काही विद्यार्थ्यांना कॅप फेर्‍यांसाठी नोंदणी करण्यात काही अडचणी आल्याने त्यांना या प्रक्रियेत सहभागी होता आले नव्हते. त्यामुळे त्यांनी स्वतंत्र फेरी घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार मागील वर्षी याविद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र फेरी घेण्यात आली. या पार्श्‍वभूमीवर यंदा अशा विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वेळापत्रक तयार करून संस्थास्तरावर फेर्‍या घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कॅप फेर्‍यांमधून रिक्त राहणार्‍या जागांवर या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश मिळतील. १८ जूनपासून तर १0 ऑगस्टपर्यंत या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरून सादर करता येईल.

या तारखा ठेवा लक्षात
५ ते १७ जून- प्रवेश अर्जाची ऑनलाइन नोंदणी. आवश्यक कागदपत्रांची तपासणी. प्रवेश अर्ज अंतिम करणे.
१९ जून- तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध.
२0 ते २१ जून- गुणवत्ता यादीवर हरकती नोंदविणे.
२२ जून- अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध. पहिल्या प्रवेश फेरीसाठी जागांची यादी प्रसिद्ध.
२३ ते २६ जून- ऑनलाइन पसंती अर्ज भरून अंतिम करणे.
२८ जून- पहिल्या फेरीची तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध.
२९ जून ते ३ जुलै- निवड यादीनुसार ‘एआरसी’वर जाऊन प्रवेश निश्‍चिती.
५ जुलै- दुसर्‍या फेरीसाठी रिक्त जागांची यादी प्रसिद्ध करणे.
५ ते ८ जुलै- ऑनलाइन पसंती अर्ज भरणे व अंतिम करणे.
१0 जुलै – दुसर्‍या फेरीची तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध.
११ ते १४ जुलै – निवड यादीनुसार ‘एआरसी’वर जाऊन प्रवेश निश्‍चिती. (पहिल्यांदाच निवड झाली असल्यास)
१६ जुलै- तिसर्‍या फेरीसाठी रिक्त जागांची यादी प्रसिद्ध करणे.
१६ ते १९ जुलै- पसंती अर्जात बदल करणे. स्लायडिंग, फ्लोटिंग किंवा फ्रीजिंग हे पर्याय वापरता येतील.
२१ जुलै- तिसर्‍या फेरीची तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध
२२ ते २४ जुलै- निवड यादीनुसार ‘एआरसी’वर जाऊन प्रवेश निश्‍चिती. (पहिल्यांदाच निवड झाली असल्यास)
२५ ते २९ जुलै- प्रवेश निश्‍चित केलेल्या संस्थेत जाऊन आवश्यक कागदपत्रे व शुल्क भरून प्रवेश अंतिम करणे.