इन्क्लूजीव इंडिया अंतर्गत दिव्यांगावर चर्चा

0
14

गोंदिया,दि.१५ : समावेशित शिक्षण, सर्व शिक्षा अभियान व जिल्हा शैक्षणिक सात्यतपूर्ण व्यावसायिक विकास संस्था गोंदियाच्यावतीने जि.प. सभागृहात १३ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील दिव्यांग विद्याथ्र्यांच्या शारीरिक, सामाजिक घडामोडींवर चर्चा करण्यासाठी इन्क्लुजीव इंडिया अंतर्गत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राला सरकारी वकील अ‍ॅड. विना वाजपेयी, फिजियोथॅरेपीस्ट डॉ. सदानंद थोटे, ग्रामीण पोलिस ठाण्याचे ठाणेदार सचिन ढोक, डॉ. भाग्यश्री वारके, डायटच्या डॉ.एस.डी.सूर्यवंशी, उपशिक्षणाधिकारी राजन घरडे, अजय इंगळे, डी.एल. गुप्ता, वामनराव घोसे, विजय ठोकणे, श्री मलवार उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना डॉ. वारके म्हणाले की, दिव्यांग़ पाल्यांना समजून घेणे ही पालकांची सर्वांत महत्त्वाची जबाबदारी आहे. माझ्याकडे सुद्धा दिव्यांग मुलगा असून आज तो २५ वर्षाचा असून वैद्यकीय क्षेत्रात दुकान चालवीत आहे. त्याच्या बौद्धिक, सामाजिक विकासाकडे सातत्याने लक्ष दिल्याने तो आज सक्षम झाला आहे. त्याचप्रमाणे आपण ही आपल्या पाल्यांना सक्षम करण्यासाठी लक्ष देण्याची गरज आहे. समाजात इतरांसारखेच त्यांनाही स्थान उपलब्ध करून देण्याची गरज आहे. मतिमंद मुले,शारीरिक दृष्ट्या हुशार असतात. त्यासाठी वेळीच लक्ष दिले तर परिस्थिती सुधारू शकते. आज सरकारने या सर्व मुलांसाठी घेतलेला पुढाकार अभिनंदनीय आहे. श्रीमती डॉ. सूर्यवंशी म्हणाल्या की, सरकारचे प्रगत महाराष्ट्राचे धोरण असून नियमित विद्याथ्र्यांसोबतच दिव्यांग विद्यार्थी ही शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी सर्व शिक्षा अभियान राबविले जात आहे. या सर्व दिव्यांग विद्याथ्र्यांना सामान्य विद्याथ्र्यासोबत आणण्याची गरज असून दोघांमध्येही समन्वय साधण्याची जेवढी जबाबदारी शिक्षकाची असते. तेवढीच पालकाची ही असणे गरजेचे आहे. दिव्यागाच्या इच्छाशक्तीला पाठबळाची गरज असल्याचे ही त्या म्हणाल्या. यावेळी बोलताना पोलिस निरीक्षक ठोक म्हणाले की, मी लहानपणापासूनच गावाशेजारी असलेल्या मतिमंद शाळेकडे बघितले आहे. त्यामुळे या सर्वांच्या भावना मला कळू शकतात. या दिव्यांगामध्ये वेगळा असा आत्मविश्वास असतो. त्या आत्मविश्वास व त्यांच्या इच्छाशक्तीला आपण समजून घेतले तर सामान्य विद्याथ्र्यांसारखे चांगले विद्यार्थी दिव्यांगात बघावयास मिळतील. शासन या सर्वांना सामाजिक स्थान उपलब्ध करून देण्यासाठी करीत असलेल्या कार्याचे गौरव त्यांनी केले. यावेळी इतर मान्यवरांनीही विचार व्यक्त केले. संचालन सुनील अंबुले तर प्रास्ताविक मलवार यांनी केले.