सर्वच जिल्ह्यांमध्ये शिक्षकांचा ४ नोव्हेंबरला मोर्चा

0
7

गोंदिया,दि.27 – सदोष बदली धोरणासह विविध प्रश्‍नांबाबत राज्यभरातील प्राथमिक शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. ४ नोव्हेंबरला सर्व जिल्ह्यात मोर्चे काढून या विरोधात आंदोलन उभारण्याचा निर्णय शिक्षक समन्वय समितीने घेतला आहे. याला जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे व शिक्षक संघाचे अध्यक्ष विरेंद्र कटरे ,नुतन बांगरे,अय्युब खान,अनिरुध्द मेश्राम यांनी दुजोरा दिला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील प्राथमिक शिक्षक व विद्यार्थी यांच्या संदर्भाने अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.

शासनाशी या संदर्भात अनेक वेळा चर्चा व बैठका झाल्या आहेत. परंतु कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. म्हणून काल (दि. २५) पुणे येथे सर्व संघटनांची बैठक झाली. आपला आवाज शासनापर्यंत पोचविण्यासाठी ४ नोव्हेंबरला दुपारी १ ते ४ या वेळेत प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे नियोजन करण्यात आले. मोर्चाबाबत तातडीने जिल्हा पोलिस अधिकारी कार्यालयात मोर्चाला परवानगी बाबत पत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी बहुसंख्य संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.

ज्या संघटना उपस्थित राहू शकल्या नाहीत त्यांनीही सक्रिय पाठिंबा दिला आहे. यात राज्य प्राथमिक शिक्षक संघ, राज्य प्राथमिक शिक्षक समिती, राज्य पदवीधर व केंद्रप्रमुख संघटना, राज्य प्राथमिक शिक्षक परिषद, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना, राज्य शिक्षक सेना, राज्य केंद्रप्रमुख संघटना, जुनी पेन्शन हक्क संघटन, अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघटना, उर्दु शिक्षक संघटना, एकल प्राथमिक शिक्षक मंच, स्वाभिमानी शिक्षक संघटना, डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद, महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना या संघटनांनी सहभाग घेतला असून उर्वरित संघटनांशीही समितीने संपर्क सुरू केला आहे.