२ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम होणार -सहकारमंत्री देशमुख

0
11

गोंदिया  दि.26 :: कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पहिल्या टप्प्यात गुरूवार (दि.२६) पासून रक्कम जमा केली जाणार होती. यासाठी राज्यातील ८ लाख ५० हजार शेतकऱ्यांच्या अर्जांची छाननीे करण्यात आली. मात्र ६ लाख ५० हजार अर्जांमध्ये त्रृट्या आढळल्याने आता यापैकी केवळ २ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम केली जाणार असल्याचे राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख म्हणाले.
ते आज गोंदिया येथे  पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या जनशताब्दी निमित्ताने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गोंदिया व ग्रामीण सहकार भारती प्रकोष्ठ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने  स्थानिक कटंगी येथील मयुर लाॅन येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले राहणार आहेत. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, आ. अनिल सोले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेतराम कटरे ,माजी आमदार भैरसिंग नागपूरे, आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीस राज्यातील ८७ लाख शेतकरी पात्र ठरले होते. यापैकी ७७ लाख शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज केले. शेतकऱ्यांनी केलेले आॅनलाईन अर्ज आणि आधारक्रमांक यात पडताळणी दरम्यान प्रचंड तफावत आढळली. बँका व आॅनलाईन अर्जातील माहिती जुळत नसल्याने कर्जमाफीची रक्कम देण्यास विलंब होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवार (दि.२६)पासून पहिल्या टप्प्यात ८ लाख ५० हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार असल्याचे सांगितले होते. मात्र कर्जमाफीच्या अर्जांमध्ये त्रृट्या आढळल्याने ८ लाख ५० अर्जांच्या छाननीनंतर २ लाख अर्जांमध्ये कुठल्याच त्रृट्या आढळल्या नाही. त्यामुळे या २ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. कर्जमाफीचा लाभ अपात्र शेतकऱ्यांना मिळू नये आणि योग्य लाभार्थी वंचित राहू नये,यासाठी कर्जमाफीची रक्कम जमा करण्यास विलंब होत असल्याचे सांगत देशमुख यांनी सरकारची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.