शिष्यवृत्ती घोटाळयात आणखी दोघांना अटक

0
5

गडचिरोली,-बहुचर्चित शिष्यवृत्ती घोटाळयात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. प्रशांत सेलोकर व दुर्गा वाघरे अशी आरोपींची नावे असून, त्यांना ३१ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या तीनवर पोहचली आहे. दुर्गा वाघरे ही एका राजकीय पक्षाची पदाधिकारी म्हणूनही कार्यरत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात अनेक संस्थांनी आपापली महाविद्यालये उघडली असून, विद्याथ्र्यांची शिष्यवृत्ती हडप करण्याचा सपाटा चालविला आहे. त्यात विशेषत: व्यावसायिक अभ्यासक्रम चालविणा-या संस्थांचा समावेश आहे. या संस्था आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभाग अशा दोहोंकडून शिष्यवृत्ती लाटत होत्या. काही संस्था तर बोगस पटसंख्या दाखवून शिष्यवृत्ती हडप करीत होत्या. ही बाब लक्षात येताच गडचिरोली येथील आदिवासी विकास प्रकल्पाचे तत्कालिन प्रकल्प अधिकारी पी. शिवशंकर यांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी महिनाभरापूर्वी काही संस्थांच्या प्रमुखांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र हे आरोपी फरार आहेत. अशातच पोलिसांनी तपासचचक्रे वेगाने फिरवून तीन जणांना अटक केली आहे. २२ जानेवारी रोजी पोलिसांनी आष्टी येथील गुरुसाई टेक्नीकल कॉलेजचे प्राचार्य ऋषिदेव जयराम धुरके यास अटक केली. त्यानंतर काल २३ जानेवारी रोजी गडचिरोली येथील समर्थ बालाजी टेक्नीकल इन्स्टीट्यूटचे अध्यक्ष प्रशांत सेलोकर व प्राचार्य दुर्गा वाघरे यांना कलम ४२०,४०९,४६५,४६७,४७१ अन्वये गुन्हे दाखल करून अटक केली. न्यायालयाने त्यांना ३१ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र पाटील प्रकरणाचा तपास करीत आहेत.