ओबामांच्या ‘गॉड ऑफ ऑनर’चं नेतृत्व केलं विंग कमांडर पूजा ठाकूरनं !

0
9

नवी दिल्ली – देशभरात घडणार्‍या महिलांवर अत्याचाराच्या घटना आणि महिलानं कमी लेखणार्‍या पुरूष प्रधान संस्कृतीला आज एक सणसणीत चपराक लगावली गेलीये.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांचं भारतात शानदार स्वागत झालं. त्यांच्या स्वागतात एक अभिमानाची गोष्ट घडली. राष्ट्रपती भवनात ओबामांना जेव्हा गार्ड ऑफ ऑनर दिला, तेव्हा या ‘गार्ड ऑफ ऑनर’चं नेतृत्व केलं एका महिलेनं…विंग कमांडर पूजा ठाकूर यांनी.
आज (रविवार) सकाळी दहा वाजता भारतात आगमन झालेल्या ओबामा यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले. त्यानंतर ओबामा हॉटेलकडे रवाना झाले. ओबामांसाठी राष्ट्रपती भवनात गार्ड ऑफ ऑनरचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमात ओबामा राष्ट्रपती भवनात दाखल झाल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळातील मंत्री उपस्थित होते.
ओबामांचे राष्ट्रपती भवनात 21 तोफांची सलामी देत स्वागत करण्यात आले. त्यानंतर विंग कमांडर पूजा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली त्यांना मानवंदना देण्यात आली. भारतात प्रथमच एखाद्या देशाच्या अध्यक्षांना महिला कमांडरच्या नेतृत्वाखालील पथकाकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आले आहे. ओबामा यांनीही भारताकडून देण्यात येत असलेल्या आदरातिथ्याने आपण भारावून गेल्याचे म्हटले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमातही एखादी महिला अधिकारीच परेडचे नेतृत्व करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना सन्मानित करण्याची जबाबदारी एका महिलेनं अगदी सुत्रबद्ध आणि पूर्ण ताकदीने पार पाडलीये. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना गॉड ऑफ ऑनर देण्याची जबाबदारी आपल्यावर टाकण्यात आली याबद्दल मी खरंच भाग्यशाली समजते अशी भावना विंग कमांडर पूजा ठाकूर यांनी व्यक्त केलं.