२६ विद्यार्थ्यांचे प्राण थोडक्यात वाचले!

0
14

नागपूर,दि.14ः- चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने २६ विद्यार्थ्यांंना विषबाधा झाल्याने एकच खळबळ उडाली. चिमूरचे आ. बंटीभाऊ भांगडिया यांनी तत्परता दाखविल्यामुळे विद्यार्थ्यांंना वेळेत नागपुरात आणण्यात आले. मेडिकल रुग्णालयात ताबडतोब उपचार मिळाल्याने विद्यार्थ्यांंचे प्राण थोडक्यात वाचले. सध्या मेडिकलमध्ये उपचार सुरू असून, सर्व २६ विद्यार्थ्यांंची प्रकृती धोक्याबाहेर आहे. मेडिकलचे तज्ज्ञ डॉक्टर विद्यार्थ्यांंच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.
चंद्रपूर जिल्हय़ातील नागभीड तालुक्यातील कोरधा येथील जि.प.च्या शाळा परिसरात सोमवारी दुपारी प्रकार उघडकीस आला. प्रकरण असे की, कोरधा जि. प. शाळेत दुपारी २.३0 वाजताच्या सुमारास जेवणाची (मध्यांतर) सुटी झाली. शाळेच्या मागेच चंद्रज्योतीच्या बियाचे झाड आहे. अंदाजे १0 ते १४ वयोगटातील एकूण २६ विद्यार्थी शाळेबाहेर आले. त्यापैकी एक विद्यार्थी हा झाडावर चढला. त्याने चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्या. बियांची चव गोड असते. त्यामुळे दुसर्‍याही विद्यार्थ्याने खाल्ल्या. नंतर सर्वच विद्यार्थ्याने बिया खाल्ल्या. त्यानंतर सर्व २६ विद्यार्थी शाळेत आल्यानंतर त्यांना ओकारी व्हायला लागली. मध्यान्ह भोजणामुळे तर विषबाधा झाली नसेल, या शंकेने शिक्षकांमध्ये चांगलीच घबराट पसरली. पण, विद्यार्थ्यांंनी चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याचे सांगितल्यानंतर शिक्षकांनी ताबडतोब नागभीडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती शिक्षकांनी चिमूरचे आ. बंटीभाऊ भांगडिया यांनासुद्धा दिली. विद्यार्थ्यांंवर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार झाल्यानंतर आ. भांगडिया यांनी तत्परता दाखवित मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्याशी संपर्क साधला. घटनेची माहिती दिली आणि उपचारासंदर्भात उपाययोजना तयार ठेवण्यास सांगितले. प्राथमिक उपचारानंतर १0८ क्रमांकाच्या दोन रुग्णवाहिकेतून २६ विद्यार्थ्यांंना सायंकाळी मेडिकल रुग्णालयात आणण्यात आले. आ. भांगडिया यांनी केलेल्या सूचनेवरून अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मेडिकलच्या डॉक्टरांची टीम तयारच होती. विद्यार्थी दाखल होताच बालरोग तज्ज्ञांच्या चमूने वेळ न दवडता त्यांच्यावर ताबडतोब उपचार सुरू केले. जनसंपर्क अधिकारी डॉ. गिरीश भुयार यांनी परिस्थिती हाताळत डॉक्टरांना उपचारासाठी वेळोवेळी सूचना केल्या. सर्व डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्टा करीत विद्यार्थ्यांंवर उपचार केले. सध्या सर्व विद्यार्थी डे केअर वॉर्डात उपचार घेत असून, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.