ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयात उतुंग भरारी

0
46

गोंदिया,दि.08 : केंद्र शासनाकडून जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश घेण्याकरिता दरवर्षी नवोदय पात्रता परीक्षा घेण्यात येते. या वर्षीही ६ एप्रिल रोजी जिल्ह्यातील इयत्ता ५ वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सत्र २०१९-२० करिता इयत्ता ६ वी जवाहर नवोदय विद्यालयमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी नवोदय पात्रता परीक्षा दिलेली होती. या परीक्षेत जिल्ह्यातील अतिदुर्गम व ग्रामीण क्षेत्रातील ५७ विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल त्यांचा गौरव करण्यासाठी ६ जून रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली सभापती रमेश अंबुले, शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला..

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधायुक्त केंद्रीय विद्यालयाच्या शाळांमध्ये दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण घेता यावे याकरिता केंद्र शासनाने जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना १९८६ मध्ये करण्यात आली होती. याचा लाभ अधिकाधिक ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. तसेच आपला सर्वांगीण विकास या विद्यालयाच्या माध्यमातून करून उच्च पदावरती प्रत्येक विद्यार्थी पोहोचला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. राजा दयानिधी यांनी करून विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना आणि शिक्षकांना मार्गदर्शन केले. .

जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेण्याकरिता विद्यार्थ्यांनी जवाहर नवोदय विद्यालयात प्रावीण्य प्राप्त केल्याबद्दल विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचे अभिनंदन रमेश अंबुले यांनी केले. तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून येत्या शैक्षणिक सत्रात ग्रामीण भागातील १०० टक्के विद्यार्थ्यांचा समावेश नवोदय पात्रता परीक्षेकरिता करण्यात येईल, याबाबत शास्वती दिली. याप्रसंगी विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास एकूण पात्र ५७ विद्यार्थ्यांपैकी ३८ विद्यार्थी हजर होते. यामध्ये क्रिश कुवरलाल बघेले, धनश्री योगराज बिसेन या दोन दिव्यांग विद्यार्थ्यांचासुद्धा समावेश होता. तसेच आमगाव २, अर्जुनी मोरगाव १, देवरी ६, गोंदिया ४, गोरेगाव १३, सालेकसा ३, सडक अर्जुनी ७ व तिरोडा २ अशा प्रकारे विद्यार्थ्यांचा डॉ. राजा दयानिधी, रमेश अंबुले, उल्हास नरड यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र व गुलाबाचे फुल देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थी, पालक व शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, काही गावातील सरपंच उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विजय ठोकणे यांनी केले तर आभार बाळकृष्ण बिसेन यांनी मानले. यशस्वितेसाठी कुलदीपिका बोरकर, दिलीप बघेले, मनोजकुमार शेणमारे यांनी सहकार्य केले. .