विनायक देशपांडे नागपूर विद्यापीठाचे कार्यकारी प्र-कुलगुरू

0
11

नागपूर,दि.17 : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रमोद येवले यांची नियुक्ती झाल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात प्रशासकीय बदल झाले आहेत. प्रभारी कुलसचिव डॉ. विनायक देशपांडे यांना कार्यकारी प्र-कुलगुरू म्हणून नियुक्त करण्यात आले.‘एलआयटी’तील प्रोफेसर डॉ. नीरज खटी यांना परत एकदा  कुलसचिवपदाचा प्रभार देण्यात आला आहे. कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी आपल्या अधिकारात या नियुक्त्या केल्या आहेत.
नवीन विद्यापीठ कायद्यानुसार प्र-कुलगुरूंकडे मोठ्या प्रमाणात जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. विद्यापीठात कुलगुरूंनी विविध अधिकारी तसेच ज्येष्ठ प्राध्यापकांशी चर्चा केली. सायंकाळी विद्यापीठाचे कामकाज बंद होण्याच्या वेळेवर अचानकपणे ही घोषणा करण्यात आली.
डॉ. विनायक देशपांडे हे वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठातादेखील होते. एकाचवेळी दोन मोठ्या जबाबदाºया सांभाळण्यात अडचण येईल ही बाब लक्षात घेऊन कुलगुरूंनी व्यवसाय व्यवस्थापन विभागप्रमुख डॉ. अनंत देशमुख यांच्याकडे वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या अधिष्ठातापदाचा प्रभार सोपविला आहे. सायंकाळी ६.३० वाजता डॉ. देशपांडे यांनी कार्यकारी प्र-कुलगुरूपदाचा प्रभार स्वीकारला. यावेळी कुलगुरुंसमवेत वित्त व लेखा अधिकारी डॉ. राजू हिवसे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. अनिल हिरेखण, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.गोवर्धन खडेकर होते.